
Nashik NCP Sharad Pawar Shibir : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये १५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य आक्रोश मोर्चा होणार आहे. स्वत: शरद पवार हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. नाशिकमध्ये आयोजित या मोर्चापूर्वीच 'देवा तूच सांग' या बॅनर आणि जाहिरातीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देण्यात आलेल्या या जाहीराती चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य करताना सरकारने थेट जीआर काढला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपने ‘देवा भाऊ’हे कॅम्पेन राबवत राज्यभर जोरदार फलकबाजी केली होती. फडणवीस यांच्या त्या कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून ‘देवा तूच सांग’ ने प्रत्युत्तर असल्याचे म्हटलं जात आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज (दि. १४) एकदिवसीय शिबिर होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबीर होत आहे. त्यानंतर सोमवारी १५ सप्टेंबरला गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य आक्रोश मोर्चा होणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे.
जाहिरातीत नेमकं काय?
देवा तूच सांग ... असं या जाहीरातीचं शिर्षक आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या ओवीप्रमाणे राज्यात भेदभाव करून वाद वाढवण्यापेक्षा
मुद्द्याचं बोला..! असं जाहीरातीत खाली म्हटलं आहे.
शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा पिकाला हमीभाव, भावांतर योजना, युवांना नोकरी, लाडक्या बहिणींना 2100 रु. कापूस आयात, असुरक्षित महिला, कांदा निर्यातबंदी , अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे विचारण्यात आला आहे. हे स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार? असा सवाल जाहीरातीत करण्यात आला आहे.
तसेच या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आले आहे. दरम्यान नाशिकमध्ये आयोजित शिबिरापूर्वीच देवा तूच सांग या बॅनर आणि जाहिरातीची राज्यभरात चर्चा सुरू आहे.
पिवळ्या रंगाची उधळण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या या जाहीरातीत पिवळा रंग वापरला आहे. ओबीसी समाजाच्या मोर्चातही पिवळ्या रंगाचे फेटे, रुमाल दिसलेत. ओबीसींना जवळ करण्यासाठी हा प्रयोग तर नाही ना अशीही चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.