Nagar News : नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा भाजपचे दिवंगत माजी खासदार अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर आज धडकणार आहे. या मोर्चाचे आपण स्वागत करू. त्यांना सामोरे जाऊन बँकेतील आर्थिक व्यवहारांची वस्तुनिष्ठ माहिती देऊ, अशी भूमिका बँकेतील सत्ताधारी सहकार पॅनेलचे नेतृत्व करणारे आणि दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. सुवेंद्र गांधी यांच्या या भूमिकेमुळे ठेवीदार आणि गांधी परिवार मोर्चात समोरासमोर येणार, असे चित्र दिसत आहे.
नगर अर्बन बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. यामुळे बँकेत 2 हजार 400 ठेवीदारांच्या सुमारे 350 कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. बँक सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैरकारभारामुळे बुडाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. बँक वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचा दावा ठेवीदार आणि त्यांना पाठबळ असलेल्या विरोधकांनी काढला आहे. अर्बन बँकेच्या नगर शहरातील मुख्य कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होऊन, हा मोर्चा दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर जाणार आहे. यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चासाठी सकाळपासूनच ठेवीदार नगर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर जमा व्हायला सुरुवात झाली. परंतु यातच सुवेंद्र गांधी यांनी मोर्चाविषयी मोठी भूमिका मांडली.
नगर अर्बन बँकेत सत्ताधारी सहकारी पॅनेलचे नेतृत्व करणारे सुवेंद्र गांधी म्हणाले, "मोर्चा बंगल्यावर येतो, याची माहिती मिळाली. मी त्याचे स्वागत करणार आहे. मी पळून जाणार नाही. या मोर्चामागे काय राजकारण आहे, हे सर्वांना माहीत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थिती चांगली आहे. परंतु रिझर्व्ह बँकेचे निर्बंध येणे यामागे राजकारण झाले आहे. बँकेची लिक्विडिटी 410 कोटी आहे. कर्जदाराकडून 800 कोटी येणे आहे. अशा परिस्थितीत बँक 1300 कोटींपर्यंत गेली होती. यानंतर मात्र बँकेवर प्रशासक आले. दोन वर्षे प्रशासकाने बोगस कारभार केला. या काळात देखील ठेवीदारांना व्याजासह रक्कम परत करण्यात बँक सक्षम ठरली". यातच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. असे असले, तरी आम्ही थकबाकीदार 170 कर्जदारांच्या मालमत्ता ताबा नोटीस चिटकवल्या आहेत. यातील 160 जणांची मालमत्ता बँक ताब्यात घेणार आहे. यातील 20 थकबाकीदार कर्जदारांचे दावे निकाली निघाले आहेत
राजकीय विषय वेगळे असले, तरी बँक आम्हाला वाचवायची आहे. राजकीय द्वेषापोटी आम्हाला टार्गेट केले जात आहे. बँक बुडत आहे, असे सांगून कर्ज भरणाऱ्यांना भरू दिले जात नाही. परंतु हा गैरसमज आहे. बँकेचे कर्ज घेतलेल्यांकडून कर्ज वसूलच होईल. शेवटपर्यंत ही कारवाई होतच राहते. आजही ठेवीदारांचे पैसे देण्याची आमची मानसिकता आहे. ठेवीदारांच्या ठेवी सुरुवातीलाच सुरक्षित करून ठेवल्या आहेत. पाच लाखांच्या ठेवी असलेल्या 95 टक्के ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या आहेत. परंतु बँकिंग नियम कडक झाले आहे. मोठ्या बँकांना नियमांमध्ये सूट आहे. छोट्या बँकांना नियमांचा मोठा त्रास आहे. बँकिंग धोरण आता कडक झाले आहे. त्यामुळे चांगले पाऊलं उचलले जात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"113 वर्षांची परंपरा असलेल्या 'अर्बन'लाच का टार्गेट केले जात आहे, हादेखील संशोधनाचा विषय आहे. जिल्हा बँकेत किती घोटाळे आहेत, याचा अभ्यास केल्यावर काय होईल, हेदेखील पाहिले पाहिजे. ही व्यापाऱ्यांची बँक आहे. सहकार पॅनेलच्या माध्यमातून बँकेने निवडणूक लढविताना आम्हाला लोकांना भरघोस मतांनी निवडून दिले. आम्ही चुकीचे असतो, तर लोकांनी आम्हाला मते दिली नसती. त्यावेळेला बँक वाचवण्याची इच्छा होती, तर मग माजी संचालक पळून का गेले. टीका-टिप्पणी करणाऱ्या विरोधकांनी एक कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करू दाखवावे. टीका-टिप्पणीमुळे बँक अडचणीत आली अन् बँकेतील 400 कामगारांना हे रस्त्यावर आणत आहेत. विरोधकांना विरोध करत राहू द्या, आम्ही बँक वाचवण्यासाठी काम करत राहू," असेही सुवेंद्र गांधी म्हणाले.