Nagar: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या समारोपात पारनेरमधील लोकनेत्यांनी स्वाभिमानाची तुतारी दिल्लीत फुंकावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी यावर अद्याप भाष्य केले नसले, तरी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते आमदार लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला हवा देत आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीदेखील आमदार लंके यांच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सत्ताधाऱ्यांना कशी भीती वाटते यावरदेखील भाष्य केले आहे.
आमदार तनपुरे म्हणाले, "'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याला नगरमध्ये मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमच्या पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हेच या महानाट्यात अभिनय सादर करत आहेत. आम्हाला खात्री आहे की, येथून पुढे अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजवण्यासाठी पुढे सरसावतील. आमदार लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येतील का? यावर हजर जबाब देत 'का नाही येणार?', असा प्रतिप्रश्न आमदार तनपुरे यांनी केला.
नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी (Nagar Lok Sabha Constituency 2024) ते उमेदवारी करतील का? यावर थोडे थांबा ना! महाविकास आघाडीमार्फत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तोला-मोलाचा उमेदवार मिळेल, असे आमदार तनपुरे यांनी स्पष्ट केले. परंतु नगर दक्षिणेसाठी आपले नाव चर्चेत नाही. मी विधानसभाच लढवणार आहे आणि लोकसभेसाठी माध्यमांनी माझे नाव चर्चेत आणू नये, अशीदेखील विनंती आमदार तनपुरे यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरकारने नेमलेल्या प्रशासकांना आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. निवडणुका होतील की नाही, या प्रश्नावर आमदार तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती वाटते, अशा खोचक शब्दांत टीका केली.
ते म्हणाले, "अधिवेशन झाले. त्यात चर्चा होती, महापालिकेच्या वार्डमध्ये किती नगरसेवक असावेत. त्या विधेयकावर भाषण करताना म्हटले होते की, आपण कोणत्या विधेयकावर चर्चा करत आहोत. त्यापेक्षा महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा होतील, याचा एखादा अध्यादेश किंवा विधेयक आणले पाहिजे. परंतु सरकारलाच या निवडणुका नको असाव्यात. एक तर त्यांना पराभवाची भीती वाटत असावी". लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती आहे. तसा त्यांचा लोकसभेलादेखील पराभव होणार आहे. प्रशासक त्यांचे आहेत. सरकारने वरून सांगितल्यावर त्यांचेच काम होतात. विरोधकांची कामे होणार नाहीत, यासाठी दडपशाहीदेखील चालू आहे, असा गंभीर आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.
याशिवाय देशाच्या राज्यघटनेतदेखील लिहिले आहे की, देशातील कोणत्याही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी व्हाव्यात. तशी घटनेतच तरतूद आहे. मात्र, आगामी काळात देशाचा कारभार संविधानानुसार चालणार आहे का?, याबाबत शंका वाटू लागली आहे, अशी टिप्पणीदेखील आमदार तनपुरे यांनी केली.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.