Nandurbar News : नंदुरबार मतदारसंघात डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीला भाजपच्या प्रस्थापितांचा विरोध वाढतो आहे. अनेक इच्छुक देखील कामाला लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उकळ्या फुटात आहेत. मात्र नंदुरबार मतदारसंघातून भाजपच्या डॉ. गावित हॅटट्रिकसाठी घाम गाळत आहेत.
गेले वर्षभर त्यांनी आपले पारंपारिक व सरंजामी राजकारण बाजूला ठेवले आहे. नेत्यांऐवजी थेट कार्यकर्ते आणि सरपंचांशी संवाद सुरू केला आहे. तळागाळात प्रचार करून स्वतःची ताकद आजमावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पक्षातील वरिष्ठांना मात्र त्यांचे हे नवे राजकारण पसंत पडलेले नाही.
नंदुरबार (Nandurbar) मतदारसंघात सध्या भाजपमध्ये आमदार राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, डॉ. विशाल वळवी आणि पक्षाचे अनेकदा प्रतिनिधित्व केलेले डॉ. सुहास नटावदकर यांच्या कन्या डॉ. समिधा हे इच्छुक उमेदवार आहेत. या इच्छुक उमेदवारांना पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी बळ दिले आहे.
या सर्व प्रस्थापित नेत्यांनी उमेदवार बदला विजयाची हमी आमची असा संदेश पक्षाला दिला आहे. त्यामुळे निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तसे डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांची चिंता देखील वाढत आहे. वरिष्ठांशी संपर्क आणि प्रभावी काम हाच त्यांचा 'युएसपी' आहे. त्यावर उमेदवारी मिळेल हा त्यांचा विश्वास आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नंदुरबार शहराचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गावित यांचे कट्टर विरोधक आहे. सध्या अजित गटाचे मंत्री अनिल पाटील यांची त्यांना साथ मिळाली आहे. नंदुरबार मतदारसंघातील आमदार अमरीश भाई पटेल, माजी मंत्री जयकुमार रावल, दीपक पाटील आदी नेते डॉ. हिना गावित यांच्याबाबत नाराज असल्याचे बोलले जाते.
या नेत्यांनी उमेदवार 'आम्ही देतो आणि निवडून आणतो' असा पर्याय पक्षापुढे ठेवला आहे. या स्थितीत पक्षापुढे देखील उमेदवारी कोणाला द्यावी याचे धर्मसंकट निर्माण होऊ शकते. अर्थात या नेत्यांचे दिल्लीतील हाय कमांडशी कितपत जुळते यावर सर्व गणित अवलंबून आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षातील (BJP) गटबाजी आणि प्रस्थापित उमेदवाराविरुद्धची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. काँग्रेस पक्षाकडे सध्या माजी मंत्री के. सी. पाडवी, पद्माकर वळवी, माजी खासदार बापू चौरे आणि आमदार शिरीष नाईक हे चार इच्छुक उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाने उमेदवार आणि लोकसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आता उमेदवारीचा निर्णय शिल्लक आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षातील गटबाजीचा लाभ कितपत उठवता येतो, याचे गणित पक्षातील नेते मांडत आहेत. भाजपच्या असंतुष्ट नेत्यांचा सर्वाधिक संपर्क असलेल्या आणि लाभ उठवू शकेल ही काँग्रेसच्या उमेदवाराची पात्रता असणार आहे. त्यामुळे उमेदवार कोण व केव्हा जाहीर करतो, याची काँग्रेस नेते प्रतीक्षा करीत आहेत.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.