

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते व अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना 35 हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. यानंतर विरोधकांनी मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मात्र याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. त्यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केलं आहे. लाचखोरी प्रकरणात मंत्री झिरवाळ यांचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही. पुरावे असल्यास एसीबी कारवाई करते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलते होते. त्यामुळे फडणवीसांच्या कोर्टात तरी मंत्री झिरवाळ हे पुराव्या अभावी निर्दोष सिद्ध झाले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला एका मेडिकलचा परवाना पूर्ववत करण्याच्या बदल्यात 35 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं होतं. त्यावरून नरहरी झिरवाळ अडचणीत आले असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न केला की, एसीबीकडून लिपिकावर कारवाई होते. सचिवाला दुसऱ्या खात्याता पाठवलं जातं. अशा वेळी मंत्र्यांची चौकशी केली जाणार का? त्यावर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्या माझ्या कार्यालयात जरी अशा प्रकारे कोणी व्यवहार केला किंवा एखादी तक्रार आली तर माझ्याही केबिनमध्ये रेड होईल. म्हणून त्याच्याशी माझा संबंध असेलच असे नाही. मी अँटी करप्शन ब्युरोला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. कार्यालयात कारवाई झाली म्हणजे त्याच्याशी मंत्र्यांचा संबंध असतोच असे नाही. कुणी असा व्यवहार करताना पकडलं गेलं म्हणजे त्याला संबधित मंत्र्याचा आशीर्वाद किंवा वरदहस्त असतोच असे नाही.
याही प्रकरणात मंत्री झिरवाळ यांच्या विरोधात पुरावा असता तर कारवाई झाली असती. कोणतीही कारवाई करण्याआधी ACB आधी माहिती घेते. त्यावेळचे संभाषणदेखील रेकॉर्ड केले जाते, त्याच्या नोंदी घेतल्या जातात. आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींमधून झिरवाळांचे कुठेही नाव आलेलं नाही. त्यांच नाव कुठेही आलं असतं तर आम्ही निश्चितपणे झिरवाळ यांच्याकडे राजीनामा मागितला असता असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रकरण विरोधकांकडून लावून धरले जाऊ शकते. दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. मात्र आपल्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पन्न होईल, आपण सर्वांना उत्तर देण्यास तयार आहे असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
या लाचखोरी प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन विभागातील मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. रामदास गाडे यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. गाडे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत( पशुवैद्यकीय विभागात) पाठवण्याचे आदेश मंत्री झिरवळांनी यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.