Nashik Political News : नाशिक मध्य मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मतदानाची संख्या पाहता भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. त्यामुळे विरोधक यंदा त्यांना हॅटट्रिक करू देतील का? असा प्रश्न आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आमदार फरांदे नाशिक मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला येथे पिछाडीवर जावे लागले. त्यामुळे भाजपला आगामी विधानसभा निवडणूक सोपी नाही, असा संदेश गेला आहे.
लोकसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना 88 हजार 712 मते मिळाली. महायुतीचे हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना 88 हजार 906 मते मिळाली. वाजे यांना 3 हजार 806 मतांची आघाडी आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीची जवळपास दहा हजार मते घटली. विधानसभा निवडणुकीत आमदार फरांदे यांना 28 हजार 398 मतांचे मताधिक्य होते. एकंदर हे मताधिक्य संपुष्टात आले आहे.
या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते हे एक प्रबळ इच्छुक आहेत. वसंत गीते आणि फरांदे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे आमदार फरांदे या चार महिने आधीच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसने निकाल लागताच नाशिक मध्य मतदारसंघावर आपला दावा केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. दुसऱ्या इच्छुक हेमलता पाटील आहेत.
काँग्रेसचे हे दोन्ही इच्छुक मतदारांवर किती प्रभाव टाकतील ही शंका आहे. माजी नगरसेवक राहुल दिवे हे देखील या स्पर्धेत आहेत. त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपाचा वाद हा मतदारसंघ भाजपचा विजय सोपा करू शकतो. त्यात हे दोन्ही पक्ष किती राजकीय शहाणपणा दाखवतात यावर विधानसभा निवडणुकीचा कल ठरेल.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते हे येथील एक प्रबळ इच्छुक आहेत. त्यांचे निवडणुकीचे काम वर्षाचे 365 दिवस सुरू असते. सर्व घटकांशी सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास नाशिक मध्य मतदार संघात चुरशीची लढत होऊ शकते.
राज्यातील भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडलेली फूट जनतेला पसंत नसल्याचा संदेश गेला आहे. त्यामुळे भाजप विषयी नकारात्मक मत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विषयी मोठी सहानुभूती आहे.
मराठा आरक्षणाच्या वादात आमदार फरांदे यांनी ओबीसी घटकाची बाजू घेताना काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. ही सर्व स्थिती भाजपची निवडणूक अवघड करणारी आहे. त्याचा लाभ महाविकास आघाडी कसा घेते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.