BJP Vs Hemant Godse Politics : शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे. हा विरोध आता आणखी तीव्र झाला आहे. भाजपचे (BJP) पदाधिकारी गोडसे यांच्या उमेदवारीविरोधात आता थेट पदाचे राजीनामे देणार आहेत.
नाशिक मतदारसंघाच्या (Nashik Constituency) महायुतीच्या उमेदवारीचा तिढा वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल आपली आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, अपेक्षित असूनही हेमंत गोडसे यांचे नाव त्या यादीत नव्हते. याबाबत भारतीय जनता पक्ष (BJP) आणि एकनाथ शिंदे गटात तीव्र ओढाताण सुरू आहे. त्यात अजित पवार गटाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उमेदवारीचा आणखी एक ट्विस्ट पुढे आला आहे. त्यामुळे गोडसे यांच्या उमेदवारीचा हा गुंता सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे.
नाशिकच्या जागेवरून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झालेले दिसतात. आज यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. नाशिक लोकसभा (Nashik Constituency) मतदारसंघातील भाजपच्या 20 पैकी दहा ते बारा मंडल अध्यक्षांची राजीनामा देण्याची मनस्थिती आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेले एका राजकीय कार्यक्रमात भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी ही रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
राज्याच्या जागावाटपामध्ये महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून मोठा तणाव आहे. नाशिक मतदारसंघ महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी भाजपला (BJP) पाठिंबा दिल्याने शिंदे गटाला मिळाला पाहिजे. हा नैसर्गिक न्याय असला तरी गेल्या आठवडाभरात अचानक त्याला विरोध सुरू झाला आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी येथून उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे. या उमेदवारांनी थेट मुंबई गाठत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना नाशिक मतदारसंघ पक्षाला मिळावा, यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे. नाशिक शहरातदेखील यापूर्वी निरीक्षकांसमोर घोषणाबाजी, आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे भाजप या नव्या धर्म संकटात अडकला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव घेतले जात आहे. राज्यातील ओबीसी समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या ओबीसी कार्डसाठीच भाजपकडून भुजबळ यांचे नाव पुढे आल्याचे चित्र आहे. भाजपने याआधी अजित पवार गटाच्या सातारा मतदारसंघावर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यासाठी दावा केला होता. त्या बदल्यात अजित पवार गटाने प्रतिडाव टाकला आहे. नाशिक मतदारसंघाची मागणी केली आहे. महायुतीमध्ये या वाटपावरून तणाव आहे. हा तणाव आता नवे वळण घेण्याची चिन्हे आहे. त्यात छगन भुजबळ विरुद्ध गोडसे विरुद्ध भाजप असा त्रिकोण निर्माण झाला आहे.
Edited : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.