

Nashik Crime : कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत तपास सुरु केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या तपोवन रोड परिसरात आज सकाळच्या सुमारास गोदावरी नदीकाठच्या परिसरात एक काळी सुटकेस संशयास्पद अवस्थेत पडून असल्याचे दिसले. सुटकेसमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना संशय आला. त्यानंतर तत्काळ स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती देत बोलावून घेतलं.
सफाई कर्मचारी सतीश घोडुंबे यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितल की, मी सकाळी साधरण साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरात साफसफाई करत होतो. त्यावेळी मला एक बॅग आढळून आली. त्या बॅगेतून खूप वास येत होता. संशय आल्याने मी त्या बॅगेचा फोटो काढून आमच्या सुपरवायझरला पाठवला. त्यानंतर आम्ही 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच नाशिकच्या आडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह किमान चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी परिसराचा पंचनामा सुरू केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान अशा प्रकारे सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने हा शंभर टक्के घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नक्की हा खून आहे की काही अन्य प्रकार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणातील अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.