

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध बाणेर रस्त्यावरील 'चितळे बंधू' आणि 'काका हलवाई' ही मिठाईची नामांकित दुकाने फोडून पोलिसांना उघड आव्हान देणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बाणेर पोलिसांना यश आले आहे. शिवम दत्ता अवचार (वय १९, रा. नऱ्हे) आणि करण शिवाजी जमादार (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.
१६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास या दोघांनी काही अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने ही धाडसी चोरी केली होती. दुकानांचे शटर उचकटून लॉकरमधील देवपूजेचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे आरोपी पसार झाले होते.
चोरी केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या दोघांनी एक अजब शक्कल लढवली. त्यांनी थेट शहराचा 'टूर'च सुरू केला. आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून त्यांनी शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नऱ्हे आणि आंबेगाव अशा संपूर्ण पुणे शहरात फेरफटका मारला, जेणेकरून पोलिसांना त्यांचा माग काढता येऊ नये. मात्र, बाणेर पोलिसांनीही तपासाचे चक्र वेगाने फिरवले. तब्बल २२५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारीक तपासणी करत पोलिसांनी अखेर आरोपींच्या दुचाकीचा नंबर मिळवला आणि त्यांच्या घराचा पत्ता शोधून काढला.
घरफोडी केल्यापासून हे दोघेही पोलिसांच्या भीतीने सतत फिरतीवर होते आणि घरी येणे टाळत होते. मात्र, पोलीस त्यांच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून होते. दरम्यान, यातील एक आरोपी घराबाहेर फिरून कंटाळल्यानंतर केवळ अंघोळ करण्यासाठी गुपचूप घरी येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांच्या खबऱ्याने दिली. पोलिसांनी वेळ न घालवता त्याच्या घराभोवती सापळा रचला. तो अंघोळीसाठी घरात पोहोचताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या साथीदारालाही बेड्या ठोकण्यात आल्या.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन महागड्या दुचाकी, एक आयफोन १६, दोन लोखंडी पालघन आणि १२ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. शहरात हायप्रोफाईल चोऱ्या करून पोलिसांना चकवू पाहणाऱ्या या चोरट्यांचा खेळ अखेर बाणेर पोलिसांनी अत्यंत शिताफीने खलास केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.