

Nashik Gangapur Road parallel road : गंगापूर रोडवरील वाढती वर्दळ व वाहतूक कोडींचा प्रश्न लक्षात घेता पर्यायी रस्त्याची मागणी शिवसेना नेते व उपमहापौर विलास शिंदे यांनी महासभेसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
विलास शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून समर्थनगर ते मोतीवाला कॉलेज (उजवा तट कालवा) या पर्यायी रस्त्याच्या विकासाला सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी ६५.९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
गंगापूररोड हा नाशिक शहरातील उच्चभ्रूवस्तीतून जाणारा रस्ता असून अलिकडे या रस्त्यावरील रहदारी वाढल्याने हा रस्ता अपुरा पडत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत असून या रस्त्यावरील भार कमी होण्यासाठी त्याला समांतर रस्ता व्हावा, अशी मागणी जवळपास वर्षभरापासून होत आहे. त्यात ही मागणी करणारे विलास शिंदे एकटे नाहीत. गंगापूररोडला समांतर रस्ता व्हावा यासाठी यापूर्वी माजीमंत्री राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे व भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी देखील मागणी केली होती.
माजीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिल्यांदा नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात या समांतर रस्त्याचा समावेश करण्याची मागणी केली होती. महापौर झाल्यानंतर हिमगौरी आडके यांनी देखील काही दिवसांपूर्वी गंगापूररोडला समांतर रस्ता होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, या दोघांच्याही मागणीला प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर मार्च २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडला समांतर रस्ता करणे किती आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा आयुक्तांना त्यासंदर्भात विचारले असता कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थात किती व कोणती कामे करायची, याच्या सीमारेषा निश्चित करण्याची आवश्यकता आहे, अशा आशयाचे उत्तर दिले होते.
जिथे कुंभमेळा आहे, त्याच ठिकाणचे रस्ते आणि पायाभूत सुविधा करण्याला प्राधान्य दिले जात आहे. हा रस्ता प्रत्यक्ष कुंभमेळ्याशी संबंधित नाही, असे प्राधिकरणाकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: आमदार फरांदे यांची मागणी फेटाळत त्यावर फुली मारली होती.
मुख्यमंत्री भाजपचे आहेत, कुंभमेळा मंत्रीही भाजपचे असताना भाजपच्याच आमदाराची मागणी त्यावेळी मान्य करण्यात आली नाही. मात्र, हीच मागणी विलास शिंदे यांनी केल्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाने सिंहस्थाच्या सीमारेषा ओलांडून या रस्त्याला मंजुरी दिली आहे. विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही जादू केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला व भाजपच्या आमदाराला विलास शिंदे भारी पडल्याची चर्चा यानिमित्ताने शहरात राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.