

Nashik Kumbmela : कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका, कुंभमेळा प्राधिकरण आणि नगरसेवकांमध्ये होणारी बैठक पुन्हा एकदा रखडली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाकडून अद्याप नगरसेवकांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे सांगत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या विविध कामांबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना प्रेझेंटेशन देण्यात येणार होते. त्यासाठी २५ ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला प्राधिकरणाचे अधिकारी उशीरा पोहचले म्हणून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. बहुतांश नगरसेवकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर आता पुन्हा बैठक घेण्यासाठी प्राधिकरणाकडून वेळ दिला जात नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.
भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी कुंभमेळा आयुक्तांना टोला लगावत, "कितीही प्रेझेंटेशन दिले तरी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करा," असे म्हटले आहे. तसेच याआधी केदार यांनी कुंभमेळा आयुक्तांबाबत मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्राद्वारे तक्रार केली होती. भाजपचे नगरसेवक शाहू खैरे यांनीही प्राधिकरणाकडून कुंभमेळ्याच्या कामांबाबत आवश्यक माहिती दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली.
आधी बैठकीला बोलावून कुंभमेळा आयुक्त बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि आता बैठक घेण्यासाठी वेळही दिला जात नसल्याने भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. नगरसेवकांची बैठक आयोजित करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन, महापौर आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्या समन्वयातून पार पडणे अपेक्षित असताना, नाराजीचा रोख केवळ कुंभमेळा प्राधिकरणावरच का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
याबाबत, नगरसेवकांची बैठक निश्चित करण्याची जबाबदारी कोणाची असते याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे. बैठक पुन्हा बोलावली जात नाही म्हणून कुंभमेळा प्राधिकरणावर नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत.परंतु महापालिकेच्या हद्दीत होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे, त्यांच्यासाठी बैठक आयोजित करणे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे ही महापालिका प्रशासनाचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.
बैठक बोलावण्यात विशेषत: महापौरांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे बैठक रखडली असेल तर त्याची जबाबदारी एका यंत्रणेवर ढकलण्याऐवजी महापालिका, महापौर आणि कुंभमेळा प्राधिकरण या तिन्ही घटकांची भूमिका तपासणे गरजेचे आहे. मात्र, त्यावेजी केवळ कुंभमेळा प्राधिकरणावर नाराजी व्यक्त केली जात असल्याने यात राजकारण होत असल्याची कुजबुज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.