Nashik Lok Sabha Election 2024 : मागील दोन आठवड्यांपासून नाशिक मतदारसंघात 'आपण ओबीसी आपले नेते भुजबळ' असा प्रचार करणारे कॉल सेंटर सुरू आहे. त्याची प्रचिती म्हणून गेल्या दोन दिवसांत अचानक इच्छुक उमेदवार म्हणून भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) ओबीसी (OBC) कार्ड खेळले जाण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. येथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे नियमाप्रमाणे ही जागा शिंदे गटाला हवी आहे, तर भारतीय जनता पक्ष गेले दोन वर्षे येथे निवडणूक यंत्रणा उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजपनेही (BJP) या जागेचा आग्रह धरला आहे.
अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यात उडी घेतली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत नाशिक मतदारसंघात अतिशय वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय वादामुळे तिन्ही पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. भुजबळ यांच्या राजकीय डावपेचामुळे शिंदे गटाची सर्वात मोठी कोंडी होणार आहे. या मतदारसंघाचे सध्याचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी 2014 मध्ये छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये त्यांनी समीर भुजबळांचा पराभव केला होता. आता भुजबळ यांनी थेट भाजप आघाडीतच प्रवेश केला आहे. त्यामुळे थेट हेमंत गोडसे यांची उमेदवारी रद्द करून आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात ते आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर ही निवडणूक आपल्याला सोपी राहील असा त्यांचा अंदाज आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाची बैठक आज पुणे (Pune) येथे होत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीची चर्चा होईल. या वेळी मंत्री भुजबळ नाशिक मतदारसंघाबाबत चर्चा घडवून आणण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने या मतदारसंघावर यापूर्वीदेखील दावा केला होता. हा दावा कितपत टिकेल हे सांगता येत नाही. मात्र, भुजबळ यांच्यासारखा प्रभावी उमेदवार मिळाल्यास महायुतीकडून त्याला नकार देणे काहीसे अडचणीचे होऊ शकते. समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यावेळीदेखील त्यांनी आपण मुंबईची जबाबदारी स्वीकारली तरी नाशिककडे दुर्लक्ष करणार नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे नाशिकमध्ये (Nashik) सध्या भुजबळ यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून 2009 मध्ये नाशिक मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हापासून भुजबळ कुटुंबीयांना नाशिक मतदारसंघात विशेष रस राहिला आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटात होणार आहे. येथून अजित पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघावर दावा केला आहे.
भुजबळ यांच्यासाठी एक कॉल सेंटरदेखील सुरू केले आहे. या कॉल सेंटरमधून मतदार यादीतील हजारो नागरिकांना संपर्क करण्यात आला आहे. 'आपण ओबीसी आणि आपले नेते छगन भुजबळ त्यांना आपण पाठिंबा देऊया' असा संदेश या कॉल सेंटरवरून सातत्याने देण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हा संदेश देण्याचे काम सुरू होते. राजकीय पक्ष मात्र त्यापासून अलिप्त असल्याचे दिसून आले. या कॉल सेंटरचा परिणाम भुजबळ यांनी उमेदवारीसाठी केलेल्या दाव्यातून दिसून आला आहे. यानिमित्ताने येत्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते किती यशस्वी होईल, हे त्यांना उमेदवारी मिळण्यावर अवलंबून आहे. शिवाय ही उमेदवारी मिळणे तेवढे सोपे नाही, हे स्वतः भुजबळ यांनाही माहिती आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.