ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमधील महाअधिवेशन पक्षाला फलदायी ठरले आहे. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याबाबत सहमती झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे.
शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन (Adhiveshan) गेल्या आठवड्यात नाशिकला (Nashik) झाले. उद्धव ठाकरे गटाच्या दृष्टीने या अधिवेशनाला विशेष महत्त्व होते. या अधिवेशनातून आणि यशस्वी जाहीर सभेतून पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना चांगला संदेश देण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला एक सकारात्मक संदेश मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) समन्वय समितीच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरवताना प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये जागावाटप करताना महाविकास आघाडीने केलेल्या एका सर्व्हेचा आधार घेण्यात आल्याचे कळते.
या सर्व्हेमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Loksabha Constituency) शिवसेनेची संघटनात्मक यंत्रणा आणि बुथ यंत्रणा आघाडीतील अन्य घटकांच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात अडचण राहिलेली नाही.
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीच्या जागावाटपात नाशिक मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला होता. हेमंत गोडसे (Hemant Godse) हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर खासदार गोडसेंनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
सध्या खासदार गोडसे शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने आणि भाजपने आपल्या आकांक्षांना लगाम घातला, तर नाशिकची जागा शिंदे गटाला सुटू शकते. त्या स्थितीत शिंदे गटाला ठाकरे गटाशी झुंजावे लागेल अशी परिस्थिती आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिवेशन यशस्वी झाल्यानंतर पक्षप्रमुख ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती.
यावेळी त्यांनी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी कानमंत्र दिला होता. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नेमका काय संदेश दिला हे अस्पष्ट आहे. मात्र सर्व पदाधिकारी सध्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने नाशिक मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.