

MLC Election News : विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरुन महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षात मोठी रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. नाशिकची जागा भाजपकडे राहावी यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये भाजपकडे सर्वाधिक मतदारसंख्या आहे, त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनेही या जागेवर दावा सांगितला आहे.
नाशिकच्या जागेवर २०२८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे आमदार होते. आता याहीवेळेला दराडे पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पारंपारिक लढतीचा दाखला देत शिवसेनेने सर्वात आधी या जागेवर दावा सांगितला.
पंरतु असे असले तरी आता ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपची तयारी सुरु आहे. संख्याबळाचा दाखला देत भाजपने या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता नाशिकची जागा भाजपकडे आणि जळगावची भाजपची जागा शिंदेसेनेकडे अशी अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आग्रही आहेत. गुलाबराव पाटील हे आपले पुत्र प्रताप पाटील यांच्यासाठी ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुलाबराव पाटील हे स्वत: आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी प्रंचड उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. ही जागा भाजपची पारंपारिक जागा आहे परंतु जिल्ह्याचे पालकत्व आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय या दोन जमेच्या बाजू असल्याने गुलाबराव ही जागा मुलाच्या उमेदवारीसाठी पदरात पाडून घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे, नाशिकच्या जागेवरही शिवसेनेने आपला दावा सांगितला होता. मात्र, भाजप ही जागा सोडायला तयार नसल्याने शिवसेना नाशिकच्या बदल्यात जळगावची जागा मागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीत नाशिकची जागा भाजपला सोडल्यास नरेंद्र दराडे यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेनेची विभागणी झाल्यानंतर नरेंद्र दराडे यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली होती. त्याचवेळी त्यांनी या जागेचा शब्द सोडून घेतल्याचे देखील सांगितले जात आहे. परंतु नाशिकची जागा भाजपकडे गेल्यास नरेंद्र दराडेंचा राजकीय गेम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत दराडे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ येऊ शकते.
किशोर पाटलांची उडी..
दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप जळगावच्या जागेवर दावेदारी करत असताना आता त्यांच्याच शिवसेना पक्षाचे आमदार किशोर पाटील हे त्यांचे पुत्र सुमित यांच्यासाठी या जागेवर दावा करत आहेत. त्यामुळे जळगावच्या जागेचा तिडा अधिक वाढला आहे. आमदार किशोर पाटील व गुलाबराव पाटील दोघांमध्ये या जागेवरुन रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षातील दोन नेत्यांमध्ये असलेली रस्सीखेच पाहाता ही जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी त्यांची इच्छा आहे.