

Nashik Politics : कुठल्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेवर सत्ता आणायची आहे असे म्हणत मतमोजणी होईपर्यंत नाशिकमध्येच मुक्काम ठोकण्याचा निर्णय कुंभमेळामंत्री तथा निवडणूक प्रभारी गिरीश महाजन यांनी घेतला आहे. जळगावची चिंता नसून नाशिकमध्येच थांबणार असल्याचे महाजन यांनी नाशिक येथे रविवारी झालेल्या मेळाव्यात जाहीर केले.
महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात झालेल्या गोंधळामुळे फटका बसू नये म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी कंबर कसली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत काल नाशिकमध्ये विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात महाजन यांनी उमेदवारी न मिळालेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची समजूत काढली.
गिरीश महाजन म्हणाले की, महापालिकेत फक्त १२२ जागा आहेत. पण यंदा बाराशे जण इच्छुक होते. त्यामुळे निवड करणे अतिशय अवघड होते. त्यामुळे आम्ही काही निकष लावले आणि त्या आधारावरच उमेदवारी दिली. अनेकजण नाराज झाले; पण आमच्यासमोरही काही पर्याय नव्हता. इतर पक्षांतून आलेल्या मातब्बरांचेही समाधान करणे गरजेचे होते. ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे भाजपचा उमेदवार विजयी होतच नव्हता, अशा ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली अशी समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
२५ हजार कोटींचा निधी
महाजन म्हणाले, ३० वर्षांपासून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या निष्ठावानांना तिकीट मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये २५ हजार कोटींचा निधी येणार आहे. या निधीतून शहरात विकासकामे उभी करण्यासाठी महापालिका ताब्यात घेणे गरजेचे आहे.
महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मोठ्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाजपने न जिंकलेल्या प्रभागात कमळ फुलेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. त्यामुळे मला जळगावची चिंता नाही. मतमोजणीहोईपर्यंत मी नाशिकमध्येच असेल असेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे जळगावपेक्षाही महाजन यांनी नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.