Nashik News : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे. काल (शनिवारी) त्यांनी येवल्यात पहिली सभा घेतली. पवार आपल्या दौऱ्यांची सुरवात अजितदादांसोबत गेलेल्या दिलीप वळसे पाटलांच्या मतदार संघातून (आंबेगाव) करणार होते. पवारांना आपला दौरा का बदलावा लागला, याविषय़ी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी दौऱ्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात येवला येथे सभा घेतली. यावेळी पवार यांनी भुजबळांवर टीका केली. त्याला आज (रविवारी) पत्रकार परिषद घेऊन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. काही दिवसात अनेक मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"मी ओबीसी नेता आहे. देशभर भाषण करीत असतो. त्यामुळे कदाचित त्यांनी येवला निवडला असावा. त्यांना वाटते पक्षात मी हे बंड घडवले असावे. मात्र त्यात माझा काहीच संबंध नाही. हे बंड त्यांच्या घरातून झाले आहे. प्रफुल्ल पटेल हे त्यांचे दिल्लीतील सहकारी आहेत. अजित पवार हे त्यांचे घरचे आहेत. दिलीप वळसे-पाटील हे तर त्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचे सहायक राहिले आहेत. वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात सभा ठरली होती. त्याठिकाणी पवार साहेब गेले नाहीत. मात्र येवल्याला आले, याचं वाईट वाटते," असा टोला भुजबळांनी पवारांना लगावला.
शरद पवार यांच्या या विधानाला भुजबळांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. ते म्हणाले, "शरद पवार साहेबांनी मला येवल्याला पाठवलं नाही, मीच येवल्याची निवड केली.येथे संघर्ष केला, येथील जनतेने प्रेम दिलं, याठिकाणी चार वेळा निवडून आलो,
" ६५ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं, ही सगळी मंडळी तुम्हाला सोडून गेलीत, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल का गेले, हे सर्व सगळं भूजबळांनी घडवून आणलं असं पवारसाहेबांना वाटतं, पण ही चुकीची कल्पना आहे, असे भुजबळ म्हणाले. पवारांना राजीनामा मागे घ्यायचा होता, तर मग राजीनामा का दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भुजबळ म्हणाले, "शरद पवार साहेब तुम्ही येवल्याला का आलात, हे मला कळलच नाही. मी ओबीसी आहे, म्हणून आलात का?. अहो हे बंड मी घडवून आणलेले नाही, ते तुमच्या घरातून सुरू झाले’
भुजबळ म्हणाले, "अलीकडे ज्या चर्चा झाल्या त्या सर्व चर्चांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हेच होते. मी नव्हतो. तुम्ही हे सर्व केलं, तर मला दोष देऊन काय उपयोग आहे. या सर्वात ५४ आमदारांच्या सह्या होत्या. यात जयंत पाटील, रोहित पवार, यांच्याही सह्या होत्या. पण आमदांरांनी मी ज्येष्ठ आहे म्हणून मला बोलायला सांगितलं. साहेबांच्या घरातच, साहेब, अजित दादा आणि सुप्रिया ताई यांचं ठरलं. साहेब म्हणाले, मी राजीनामा देणार तुम्ही काय करायचं ते करा,"
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.