

Nashik Politics : महापालिकेची तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता बुधवार (दि. २५) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आता सभापती पदाची निवड होणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही कोणताही धोका पत्कारावा लागू नये यासाठी भाजपसह शिवसेनेचे सदस्य सोमवारी (दि. २३) एका अज्ञातस्थळी रवाना झाले होते. ते गुजरातला जात असल्याची चर्चा होती. मात्र नक्की कुठे हे माहित नव्हते.
त्यानंतर आज मंगळवार (दि. २४) भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसमुळे हे अज्ञातस्थळ सगळ्यांच्या समोर आलं आहे. इंडिया आणि भारत असे शिर्षक देत फोटोसह केदार यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवले आहे. सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी त्यांनी ही पोस्ट टाकली आहे. त्यावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य नक्की कुठे सहलीला गेले आहेत याचाही उलगडा झाला आहे.
शहराध्यक्ष केदार यांनी व्हाट्सअप स्टेटसला लिहलं आहे की, नाशिक गुजरात सीमेवर सापुतारा व सुरगाणा सीमेवर हतगड गावातील रॅडिसन या तारांकित रिसॉर्टवर मुक्कामी होतो. नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला बाहेर पडलो. रिसॉर्टवरील सायकल भाडे ५०० रुपये होते. मग पायीच रिसॉर्ट मागील राजु काशिराम बागुल यांच्या मळ्यात शेतावर गेलो व शेतात फेरफटका मारला. तेथे काकडी, वाल, घेवडा लागवड केली होती. या वर्षी भात व नागली पिके व्यवस्थित आली नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याने केलेले कष्ट वाया गेले असे त्यांनी सांगितले. एका बाजुला पंचतारांकित संस्कृती व बाजुलाच भिंती शेजारी खेडे संस्कृती दिसली. मला एकाच ठिकाणी इंडिया व भारत पहायला मिळाला. असं केदार यांनी लिहलं आहे.
फुटीच्या धास्तीने भाजप- शिवसेनेचे सदस्य थेट इंडिया-भारत सीमेवर गेल्याच्या गमतीशीर चर्चा नाशिकमध्ये सुरु झाल्या आहेत. साहजिकच शहराध्यक्ष सुनिल केदार जिथे सदस्य पण तिथे' म्हणून हे सगळेजण याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे ९ व शिवसेनेचे ४ असे १३ स्थायी समितीचे सदस्यही याच हतगड गावातील रॅडिसन या तारांकित रिसॉर्टवर मुक्कामी होते. ते आजही तिथेच थांबतील. बुधवार (दि.२५) पहाटे नाशिकच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती आहे.
सभापतिपदासाठी भाजपचे मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा झाली असून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्याचवेळी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील अर्ज दाखल करून ट्विस्ट निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला कोणताही धोका पत्कारायचा नाही. मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर सानप यांची बिनविरोध निवड होऊ शकते. अन्यथा निवडणूक घ्यावी लागेल.
स्थायी समितीवर भाजपचे ९, शिवसेना व मनसेचे ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे २ व राष्ट्रवादीकडून नोंदणी केलेल अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. स्पष्ट बहुमतासाठी ९ मतांची गरज असून भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यात भाजपला शिवसेना - मनसेचे ४ सदस्यांची सोबत आहे. त्यामुळे भाजपकडे एकुण १३ सदस्यांचे बलाबल असल्याने स्थायी समिती सभापती भाजपचा आणि मच्छिंद्र सानप हेच होणार हे निश्चित आहे.
भाजपकडून मच्छिंद्र सानप यांचे अगोदर उपमहापौरपदासाठी नाव घोषित करण्यात आले होते. परंतु भाजपने वेळेवर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उपमहापौरपद शिवसेनेला द्यावे लागल्याने पक्षाने सानप यांना अर्ज माघार घेण्याचे आदेश दिले होते. सानप यांनीही पक्षाचा आदेश पाळत अर्ज माघारी घेतला होता. तेव्हा, शिवसेनेच्या विलास शिंदे यांना उपमहापौर करण्यात आले. त्या बदल्यात पक्षाचा आदेश पाळणाऱ्या मच्छिंद्र सानप यांना स्थायी समितीच्या सभापतीपदाची बक्षिसी भाजपकडून दिली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.