

Nashik politics : भाजपने एकापाठोपाठ दिलेल्या धक्क्यानंतर महाविकास आघाडी (मविआ) जागावाटपासंदर्भात सावध झाली आहे. आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी गुरुवारी एकत्रित बैठक घेत जागावाटपाचा अंतिम आढावा घेतला. प्रभागनिहाय जागांचा ‘फॉर्म्युला’ ठरवताना ज्या पक्षाचे प्राबल्य अधिक असेल, त्याला ती जागा सोडण्यावर नेत्यांचे एकमत झाले आहे. यात शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने, नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ‘मोठा भाऊ’ ठरण्याचे चित्र निर्माण झाले आहे
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक गुरुवारी (ता. २५) शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली. या वेळी शिवसेनेचे माजी आमदार वसंत गिते, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, उल्हास सातभाई, राजेंद्र बागूल, दिनेश बच्छाव, रईस शेख, गौरव सोनार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकूळ पिंगळे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आदी उपस्थित होते.
जागांच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ऐन थंडीत महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. काही नेते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असतानाच, भाजपला रोखण्यासाठी मविआतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी ३० ते ३५ जागांची मागणी केल्याने शिवसेनेने चर्चा थांबवली होती. मात्र, बुधवारी भाजपने नाशिकमध्ये विविध पक्षांतील नेत्यांना आपल्या गळाला लावल्याने (ऑपरेशन लोटस) मविआला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर, विरोधी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्व पक्षांनी लवचिक भूमिका घेतली आहे. बैठकीत प्रत्येक प्रभागातील उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाची ताकद यावर सविस्तर चर्चा झाली.
मनसेबाबत काँग्रेसचा वरिष्ठांकडे प्रस्ताव मुंबईत मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसने सुरवातीला विरोध दर्शवला होता. मात्र, नाशिकमधील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता आता स्थानिक काँग्रेस नेतृत्व मनसेला सोबत घेण्यास तयार झाले आहे. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात सातत्याने बैठका सुरू आहेत. शुक्रवारी हे वाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. आमच्यात ‘मोठा भाऊ’ कोण, यापेक्षा निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जात आहे. - दत्ता गायकवाड, ज्येष्ठ नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
मनसे नेत्यांमध्ये ‘तू-तू, मै-मै’
एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असतानाच, मनसे नेत्यांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शालिमार येथील शिवसेना कार्यालयातील बैठकीत मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि मनोज घोडके यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पक्ष सोडून जाण्याच्या चर्चेवरून घोडके यांनी आरोप केले असता, कोंबडे यांनी त्यांना फैलावर घेतले. अखेर सलीम शेख यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.