

Student Enrollment Fraud Maharashtra : महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी सुरू केली आहे. राज्यात ‘विशेष पटपडताळणी मोहीम’ (पॅट) सुरू करण्यात आली आहे.
पण या मोहिमेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवण्यासाठी गोलमोल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.
‘विशेष पटपडताळणी मोहिमेत’ सहभागी शाळांनी (School) विद्यार्थी संख्या पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना वर्गात बोलविल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाने नाशिकमध्ये पहिल्या टप्यात 1152 शाळांची शिरगणती झाल्याचे सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळा, अंशत: अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळा, अशा एकूण 5 हजार 557 शाळांमधील विद्यार्थ्यांची (Student) पडताळणी करण्यात येणार आहे. आजपासून दुसरा टप्पा सुरू झाला असून, 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या तपासणीचे नियोजन तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तैनात करण्यात आली. यामध्ये खासगी शाळांच्या पटपडताळणीसाठी ‘डायट’चे अधिव्याख्याता, शिक्षण विभागातील अधिकारी, पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक आहे.
तसंच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटपडताळणीसाठी पंचायत समितीतील पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामंपचायत अधिकारी, जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुखांच्या पथकांनी शाळेत जाऊन पट व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पडताळणी सुरू केली. त्यासाठी वर्गात बसविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना बोलवून बसविण्यात आले होते. शिक्षण विभागाच्या पडताळणीतून हा प्रकार उघडकीस येणे अपेक्षित असताना त्यांनी फक्त विद्यार्थ्यांची संख्याच मोजल्याचे यातून उघड झाले आहे.
परीक्षा सुरू असताना अधिकारी वर्गात गेले आणि त्यांनी फक्त हजर विद्यार्थ्यांची संख्या मोजली. शाळांनी विद्यार्थ्यांना अगोदरच सूचना केलेली असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी बरोबर त्या मुलाचे नाव घेतल्यानंतर हजेरी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही शंका आली नाही. स्टुडंट्स पोर्टलवर मुख्याध्यापकांचे लॉगिन उघडले. त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांच्या नावापुढे खुणा केल्या.
शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार त्या-त्या वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. पण सतत पोर्टल ‘हँग’ होत असल्याचे कारण पुढे करुन त्याला फाटा देण्यात आला. हाच फायदा घेत, शिक्षक अन् शाळा व्यवस्थापन विशेष पटपडताळणी मोहिमेत गोलमाल करत असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.