
Nashik Politics : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्फोटक घडामोडी घडत आहे. विद्यमान महानगरप्रमुख विलास शिंदे हे शिवसेना (शिंदे गटात) जाणार असल्याचे निश्चित झाले असून रविवारी त्यांचा पक्षप्रवेश ठरला आहे. त्यांच्या पक्षांतरापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिंदे यांच्या जागी श्रमिक सेनेचे मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीतही असेच झाले होते. बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर बडगुजर यांनीही माध्यमांशी बोलताना पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा भाजपकडे जाण्याचा कल पाहाता पक्षांतरापूर्वीच उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांना उपनेते करण्यात आलं. तोच पॅटर्न उद्धव ठाकरे यांनी याहीवेळेला राबवला.
गेल्या अनेक दिवसांपासून विलास शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी तब्बल दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे खास त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी नाशिकमध्ये आले होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिंदे शेवटी शिंदेकडेच जाणार असा सूचक इशारा दिला होता. खऱ्याअर्थाने त्याचवेळी विलास शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले होते. मात्र, रविवारी (दि. २९) शिंदे यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाल्यावर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून तातडीने त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
काल विलास शिंदे यांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी लगेचच सायंकाळी मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आल्याची माहिती एक्सपोस्ट करुन दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राऊत यांनी पोस्ट केले. त्यामुळे शिंदेंनी उद्धव ठाकरेंना झटका देण्याआधीच उद्धव ठाकरेंनी त्यांना झटका दिला.
विलास शिंदे यांची खदखद काय ?
विलास शिंदे यांनी पक्षात नेहमीच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या फुटीनंतरही मी पक्षासाठी झोकुन काम केलं. परंतु जिल्हाप्रमुखपद देताना मला डावलण्यात आलं. जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांना नेमलं, त्यांच्या मागे कार्यकर्ते देखील नाहीत, तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. सूर्यवंशी हे माझ्यापेक्षा 15 वर्ष ज्युनिअर आहेत. मग मी कनिष्ठांच्या हाताखाली काम करु का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीतही मला उमेदवारी दिली नाही. महापौर पदासाठी कधी उमेदवारी मागितली असेल तर तीही कधी दिली नाही. सतत आपल्याला डावलण्यात आलं. मी पक्षाच्या पदोन्नतीच्या कॅटेगरीत बसत नाही का? असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली तर त्याचीही दखल घेतली गेली नाही अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.