

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी- सोनांबे-शिवडे-पांढुर्ली-विंचूर दळवी ते भगूर रस्ता, कि.मी. १३/६०० ते २२/९००, प्र.जि.मा.-२६ तसेच बोरखिंड येथे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या इंटरचेंजच्या कामासाठी रु. ३४३ कोटी ९९ लाख इतक्या अंदाजित खर्चास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिककडे येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डुबेरे-सोनारी परिसरातून भगूर तसेच समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी उपलब्ध झाल्याने भाविकांच्या वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास आणि कुंभमेळ्याच्या वाहतूक नियोजनाला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.
प्रस्तावित कामामध्ये मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण व काँक्रीट रस्ता यांचा समावेश आहे. तसेच चार नवीन मोठ्या पुलांचे, चार लहान पुलांचे, पोहोचमार्गांचे, सात वाहतूक भुयारी मार्गांचे, पाच नवीन बॉक्स कल्व्हर्टचे आणि दोन नवीन पाइप कल्व्हर्टचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सुविधांमुळे कुंभमेळ्यात भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यास मोठी मदत होणार आहे.
याशिवाय संरक्षक भिंती, वृक्षलागवड, पेव्हर ब्लॉक, बसथांबा, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण, भूसंपादन, सौंदर्यीकरण, आरसीसी व कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मार्गावरील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व नागरिक सुविधा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.
कामास तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी आवश्यक वन व पर्यावरणविषयक परवानग्या, भूसंपादन, वाहतूक अडथळ्यांबाबतची खातरजमा तसेच पूल व उड्डाणपुलांच्या आखणीस सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंजूर निधीच्या मर्यादेतच कामाचा खर्च राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची निकड लक्षात घेऊन या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.