Teachers Election News : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी झोकून देऊन प्रचार सुरू केला आहे. मात्र, या निवडणुकीतील बहुतांशी उमेदवार कोट्यधीश आणि संस्थाचालक आहेत. मतदार मात्र अनेक विनाअनुदानित संस्थांमध्ये बिनपगारी शिक्षक आहेत. हा विरोधाभास प्रकर्षाने चर्चेचा विषय आहे.
या निवडणुकीत 40 उमेदवारांनी 53 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांमध्ये प्रचंड विरोधाभासाची स्थिती देखील आहे. बहुतांश प्रमुख उमेदवारांना राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती अशी राजकीय विभागणी या मतदारसंघात देखील दिसून येते.
महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे ( Sandup Gulve ) यांनी सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रानुसार त्यांच्याकडे 35 कोटींची संपत्ती आहे. भारतीय जनता पार्टीशी संबंधित विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) हे नऊ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे किशोर दराडे ( Kishor Darade ) यांच्याकडे देखील आठ कोटींची संपत्ती आहे. नगर येथील पक्ष उमेदवार राजेंद्र विखे-पाटील हे देखील बारा कोटींचे मालक आहेत. बहुतांशी प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत.
या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे शिक्षकांशी संबंधित आहेत. विनाअनुदानित संस्था, जुनी पेन्शन, शिक्षकांच्या सुविधा, शासनाकडे थकलेले अनुदान, कमी पगारात काम करणारे शिक्षक आणि अगदी कधीतरी पगार मिळेल, संस्थेला अनुदान मिळेल, या अपेक्षेने बिनपगारी काम करणारे शिक्षक देखील आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अर्धपोटी, बिन पगारी मतदार आणि कोट्यधीश उमेदवार असा विरोधाभास पाहायला मिळत आहे.
हेच शिक्षक मतदार आहेत. हे आर्थिक विषमतेचे चित्र निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा आहे. कोट्यधीश उमेदवारांना गरीब आणि अक्षरशः अर्धपोटी शिक्षकांचे प्रश्न समजतील का? समजल्यावर मांडता येतील का याची मतदारांत चर्चा आहे. गंमत म्हणजे हेच शिक्षक संस्थाचालक उमेदवारांच्या विजयासाठी प्रचारात घाम गाळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.