
Nashik municipal election : गेल्या 18 वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू हे काल मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आले. ठाकरे बंधूंनी हीच युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम ठेवली तर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलू शकतात. पक्षफुटीनंतर गर्भगळीत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला त्यामुळे नवी उभारी मिळू शकते.
त्याचवेळी नाशिक महानगरपालिकेत 'शंभर प्लस' चे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे ते स्वप्न दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भंगण्याची शक्यता व्यक्त केली जावू लागली आहे. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शहरात सध्या मोठी गळती लागली असली तरी काही प्रमाणात नाशिकमध्ये पक्षाचे संघटन अद्याप टिकून आहे. अशात हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ताकद वाढणार असून भाजपच्या शंभरहुन अधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या स्वप्नाला धक्का पोहचून आकड्यांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये शिवसेना व मनसे दोन्ही पक्षांचा प्रभाव राहिलेला असून सत्तेत राहिले आहेत. नाशिक महापालिकेत २०१२ पूर्वी शिवसेनेची सत्ता राहिली आहे. तर २०१२ ते २०१७ पर्यंत मनसेची सत्ता होती. नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थिती झालेल्या अधिवेशनामुळेच राज्यात सर्वप्रथम शिवसेना सत्तेत आली होती. राज ठाकरे यांनाही नाशिककरांनी भरभरुन दिलं आहे. २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल ४० नगरसेवक नाशिकमध्ये निवडून आले होते. नाशिक महानगरपालिकेत मनसेला सत्ता मिळाली होती.
परंतु २०१४ मध्ये देशभर भाजपची लाट आली. या लाटेचा प्रभाव राज्यात व नाशिकमध्येही पडला. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली व महापालिकेत सत्ता आणली. त्यानंतर आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये होत असल्याने आता कोणत्याही परिस्थिती नाशिकमध्ये भाजपला सत्ता हवी आहे. त्यासाठीच भाजपने शंभर प्लस चा नारा नाशिकमध्ये दिला आहे. त्यासाठी पक्षात मोठे इनकमिंग सुरु आहे. शिवसेना(शिंदे) व भाजपने मिळून नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पूर्ण पोखरलं आहे. पक्षाचे बडे बडे नेते आपल्या गळाला लावले आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी शंभर प्लसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा मोठा आटापिटा सुरु आहे. भाजपने दिलेला शंभर प्लसचा नारा म्हणजे एक प्रकारे मनपा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचाच प्लॅन दर्शवतो. मात्र ठाकरे बंधू यांच्या युतीने भाजपची धडधड वाढली असून भाजप आता स्वबळाचा त्याग करुन महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची शक्यता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.