Nashik Simhastha Kumbh 2027 : गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद ; रामतीर्थावर राष्ट्रपतींच्या तर कुशावर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Flag Hoisting : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचा प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
President Droupadi Murmu Hoists Dharmadhwaj at Ramteerth in Nashik
President Droupadi Murmu Hoists Dharmadhwaj at Ramteerth in NashikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाचा ध्वजारोहणाने शनिवारी (दि.३१) प्रारंभ झाला. नाशिकमध्ये रामतीर्थ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. दोन्हीकडे एकाच मुहूर्तावर १२. ० २ मिनिटांनी धर्मध्वजारोहण करण्यात आले.

गोदामाईच्या साक्षीने रामतीर्थ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशात फडकली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद झाला. तब्बल बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या श्रद्धेच्या महापर्वाची चाहूल देणारा हा सोहळा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन करून धर्मध्वजेला वंदन केले. पुरोहितांच्या मंत्रघोषात त्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा परममंगल क्षण साकारला. धर्मध्वजा आकाशात फडकताच शंखनादाने रामतीर्थाचा आसमंत दुमदुमला. मंगलवाद्यांच्या निनादात मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. यज्ञाहुती, गोदापूजन, ध्वजपूजन आणि धर्मध्वजारोहणाच्या पवित्र विधींनी सिंहस्थाच्या आगमनाला धार्मिक परंपरेचे अधिष्ठान लाभले. धार्मिक विधींचे पौरोहित्य पुरोहित संघाचे सतीश शुक्ल आणि अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केले. यावेळी तिन्ही वैष्णव आखाड्यांचे साधू-महंत, राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थितीत होते.

President Droupadi Murmu Hoists Dharmadhwaj at Ramteerth in Nashik
Nashik Kumbh Mela : 40 साधूंची व्यवस्था नाही, कुंभात काय होणार ; गिरीश महाजनांसमोर साधू- महंतांचा संताप, थेट बहिष्काराचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरला ध्वजारोहण

पवित्र कुशावर्त तीर्थ, गोदावरीच्या सान्निध्यात, मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे आज सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा मंगलमय सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळी कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित साधू-महंतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.

सोहळ्याच्या प्रारंभी पवित्र गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून गोदावरीचे स्तवन केले. त्यानंतर संकल्पविधी करण्यात आला. सर्व प्राणिमात्रांना सुख, शांती, समृद्धी आणि कल्याण लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

गणेशपूजनाने पूजाविधीचा प्रारंभ झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्व धार्मिक विधी आणि आयोजन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्रीगणेशाला आवाहन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून देवतांचे आवाहन केले. त्यानंतर ध्वजारोहणासाठी देवतांची अनुज्ञा मागण्यात आली. गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

या सोहळ्यास १० शैव आखाड्यांचे साधू-महंत यांच्यासह आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी पवनदत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी यांच्यासह विविध संत महंत उपस्थित होते.

President Droupadi Murmu Hoists Dharmadhwaj at Ramteerth in Nashik
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा होत असलेल्या पंचवटीसह 'या' परिसरात मद्य विक्रीवर निर्बंध घालण्याची तयारी, प्रशासनाच्या हालचाली सुरू

ध्वजस्तंभ व धर्मध्वजाचे विधिवत पूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मध्वज आणि ध्वजपताकेचे विधिवत पूजन झाले. जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांनीही धर्मध्वजाचे पूजन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.