

kumbh mela flag hoisting ceremony : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी राष्ट्रपती येणार आहेत. ध्वजारोहण, ध्वजपूजन, गोदापूजन यासह विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारा पूजा विधी निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने प्रशासनाकडून अचूक नियोजन केले जात आहे. त्यानुसार राष्ट्रपतींच्या हस्ते दुपारी दोन वाजता कुशावर्त तीर्थ येथे १२ मिनिटे गोदापूजन तर त्र्यंबकेश्वर मंदिरात १५ मिनिटे पूजाविधी होणार आहे. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे हे पौरोहित्य करणार आहेत.
राष्ट्रपती येण्यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. साधारणत: शंभर व्यक्तींची उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे. मात्र, आसन व्यवस्था करण्यासाठी कुशावर्त तीर्थ अपुर्ण पडते. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ध्वजस्तंभाजवळील जागा निश्चित केली आहे.
जागेची अडचण निर्माण होणार असल्याने सर्वांना व्यासपीठावर जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काही नगरसेवकांमध्ये थोडी नाराजी पसरली होती. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्यासमोरच जागा निश्चित करून देत या नाराजीवर तोडगा काढला. आखाड्याच्या साधु-महंतांना मुख्यमंत्र्यांच्या व शंकराचार्यांच्या रांगेत बसविले जाणार आहे. आमदार व खासदारांच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. फक्त नगरपालिकेच्या नगरसेवकांना सपत्नीक उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस, शृंगेरी पिठाचे आद्य शंकराचार्य जगद्गुरू विदुशेखर तीर्थ भारती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, आखाड्यांचे साधु-महंत, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, नगरसेवक, आमदार व खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे.
साधारणतः ६५ ते ७० वर्षांनंतर येणारा त्रिखंडाचा योग यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येत आहे. तसेच आद्य शंकराचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि असून राष्ट्रपतींच्या हस्ते गोदापूजन हे दोन्ही अत्यंत दुर्मिळ योग या सिंहस्थानिमित्ताने जुळून आले आहेत. एक धर्माचे प्रमुख तर दुसरे देशाचे प्रमुख एकाच ठिकाणी येत असल्याने हा अत्यंत अलौकिक सोहळा होणार असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी सांगितलं.
गंगासागर तलावातून पाणी आणले जाणार
कुशावर्त तीर्थावर विविध कामे जोमाने सुरु आहेत. ९ लाख लिटरची क्षमता असलेल्या कुशावर्त तीर्थात संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरासमोरील गंगासागर तलावातून पाणी आणले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजता कुशावर्त तीर्थापासून भव्य शोभा यात्रा निघणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर ते नगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत ही शोभा यात्रा निघेल. यात आदिवासी समाज बांधवांसह सर्वधर्मीय लोक सहभागी होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.