

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षीयांनी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. या दरम्यान वंचित बहुजन आघाडी पक्षाला मात्र मोठा धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती तसेच वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संजय साबळे यांच्यासह एकाचवेळी तब्बल २०० निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सामूहिक राजीनामे दिले आहे.
या सामूहिक राजीनामा नाट्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक कार्यकर्ते गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. त्याचाच विस्फोट नाशिकमध्ये झाला आहे.
पक्षातील गटबाजी, कामकाजातील गोंधळ, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवरून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत चालला होता. त्यावर वरिष्ठ नेतृत्वाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर गुरुवारी (ता.६) नाराज पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा निर्णय जाहीर केला.
माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे, पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल, भारिप बहुजन महासंघाचे माजी महानगरप्रमुख अनिल आठवले, माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव, सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे, शहर महासचिव संदीप काकळीज, सचिव किशोर महिरे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनामे देताना या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेद व्यक्त केला, वंचितच्या स्थापनेवेळी असलेली विचारधारा आणि सामाजिक न्यायाची भूमिका आता केवळ नावापुरती उरली आहे. पक्षात गटबाजी, मतभेद आणि स्वार्थी राजकारण यांना प्राधान्य मिळू लागले आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आणि पारदर्शक राजकारणासाठी निर्णय घेतल्याचे सर्वांनी सांगितले.
दरम्यान वंचितचा राजीनामा दिलेले हे सर्व २०० पदाधिकारी अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करता याकडे लक्ष लागून आहे. पुढची दिशा ठरवण्यासाठी या पदाधिकाऱ्यांची पुढच्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. त्यात सर्वांचे एकमत होईल अशा पक्षात हे पदाधिकारी प्रवेश करतील अशी माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.