

NMC Politics: धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये यंदा पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाला जबाबदार धरले जात आहे. दोन वेळा मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण न केल्याने नाशिक महापालिकेने संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करत प्रतिदिन अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गोदावरी नदीतील वाढते प्रदूषण आणि साठवण बंधाऱ्यात येणाऱ्या दूषित पाण्याच्या तक्रारींमुळे महापालिकेने गंगापूर धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनमधून पाणी उचलून ते थेट बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन जलवाहिनी प्रकल्प हाती घेण्यात आला.
पूर्वीच्या १,२०० मिमी व्यासाच्या सिमेंट जलवाहिन्या तब्बल २६ वर्षांपासून कार्यरत होत्या. कालांतराने त्यांची वहन क्षमता घटली असून गळती आणि कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी १२.५० किलोमीटर लांबीची, १,८०० मिमी व्यासाची आणि ४२५ एमएलडी क्षमतेची नवीन लोखंडी जलवाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगातून १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे कामात विलंब झाला. त्यानंतर ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच १ मे महाराष्ट्र दिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तरीही काम पूर्ण न झाल्याने प्रशासनावर टीका होऊ लागली होती.
दरम्यान, यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदाराविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. १ ते १५ मे दरम्यान प्रतिदिन एक लाख रुपये, तर १६ मेपासून प्रतिदिन अडीच लाख रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट इशारा दिला असून, ३० जूनपर्यंत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावरील कारवाई आणखी कठोर करण्यात येणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.