Nashik News : राहुल धोत्रे खून प्रकरणातील फरार संशयित असलेले माजी नगरसेवक, भाजप नेते उद्धव निमसे यांचा पोलिसांनी कसून शोध सुरु केला आहे. निमसे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके रवाना केली आहेत. उद्धव निमसे, सुनील दहिया व सुमीत हंडोरे यांच्यासह एकूण १२ जणांवर याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र पाच संशयित अद्याप फरार आहेत.
राहुल धोत्रे खून प्रकरणातील फरारी संशयितांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा धोत्रे यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शनिवारी (दि. ३०) दुपारी मृतदेह ताब्यात घेतला व पंचवटी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय घडलं होतं?
नाशिकच्या नांदूर नाका येथे २३ ऑगस्टला माजी नगरसेवक भाजप नेते उद्धव निमसे व आणि धोत्रे यांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरुन हाणामारी झाली. सायंकाळी सनी धोत्रे हा नांदूर नाका येथे उभा असताना पवन निमसे याच्या दुचाकीचे चाक सनीच्या पायावरुन गेले त्यावरुन हा वाद झाला. यावेळी निमसे गटाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 29) मृत्यू झाला. या हाणामारीचे व्हिडिओ देखील सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नाशिकच्या आडगाव नाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणात उद्धव निमसे यांचा अटक पूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर निमसे फरार असून त्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धोत्रे कुटुंबाने केली आहे. त्यानुसार निमसे यांच्या शोधासाठी पथके रवाना झाले आहेत. तसेच, व्हिडिओ फुटेजमध्ये दिसणारे संशयित सुनील दहिया व सुमीत हंडोरे यांचाही शोध सुरू आहे. याप्रकरणात सात जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उर्वरित फऱार पाच संशयितांचा कसून शोध सुरु केला आहे.
निमसे हे भाजपचे माजी नगरसेवक असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांची मोठी अडचण होऊ शकते. राहुल धोत्रे यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला गंभीर वळण आलं आहे. विरोधक हे प्रकरण उचलून धरत भारतीय जनता पक्षाची कोंडी करु शकतात. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात उडी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.