
NCP Politics News: निवडणूक आल्या की पक्षांतर करण्याची हौस अनेक नेत्यांना असते. मात्र काही नेत्यांना असे पक्षांतर चांगलेच अंगलट देखील येते. याचा अनुभव सध्या धुळे शहरातील कार्यकर्ते घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष इर्शाद जहागीरदार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. जागा वाटपात अजित पवार पक्षाला धुळे शहर मतदारसंघ मिळाला नाही. ही संधी घेत जहागीरदार यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती.
श्री. जहागीरदार यांनी निवडणुकीत जोरदार प्रचार करीत कार्यकर्त्यांना सढळ हाताने सर्व सुविधा आणि साधने उपलब्ध केली होती. मात्र येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. जहागिरदार यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. अवघे १७३५ मते मिळाल्याने त्यांची अनामत देखील जप्त झाली. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.
श्री. जहागीरदार आणि त्यांच्या समर्थकांनी नुकतीच एक दिनदर्शिका तयार केली होती. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्यानंतर समाज माध्यमांवर याबाबतचे फोटो आणि विविध पोस्ट त्यांनी व्हायरल केल्या. या सर्व पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कारभारात त्यांचा मुख्य सहभाग असेल, असे संकेत देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
जहागिरदार यांच्या या कृतीचा उलटाच परिणाम झाला. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले. त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांची संपर्क करून जहागीरदार यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, कार्याध्यक्ष सत्यजित शिसोदे, कुणाल पवार, सुमित पवार यांनी याबाबत जहागीरदार यांना ठाम विरोध दर्शवला.
सायकल चालवण्याची हौस असलेल्यांना आता घड्याळाचा मोह का होतो आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. जहागीरदार यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. या प्रवेशाला स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. विधानसभा निवडणुकीत जहागीरदार यांनी महा युतीच्या विरोधात प्रचार केला होता. महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊन लगेच यू टर्न घेण्याचे राजकीय धोरण कोणालाही पसंत पडणार नाही. त्यामुळे जहागीरदार यांनी हा विचार सोडून द्यावा. लवकरच याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते देखील मुंबईतून जहागीरदार यांना पक्षात प्रवेश नाही, अशी अधिकृत घोषणा करणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जहागिरदार समाजवादी पक्षाच्या सायकलवर ते स्वार झाले. मात्र समाजवादी पक्षाला फारशी चांगली कामगिरी या निवडणुकीत दाखविता आली नाही. त्याचा फटका आता दल बदलणाऱ्या जहागीरदार यांना बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हे राजकारण धुळे शहरातील अन्य पक्षांमध्ये ही चर्चेचा विषय ठरले आहे.
____
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.