
Nashik, 24 January : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज (ता. २४ जानेवारी) मालेगावला सहकार परिषद झाली. या परिषदेतील कामकाजापेक्षा माजी मंत्री छगन भुजबळ यांची या मेळाव्याला असलेली उपस्थिती आणि त्यांनी केलेली भाजप आणि अमित शाह यांची स्तुती याची चर्चा अधिक झाली.
मालेगाव येथील कार्यक्रमात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भारतीय जनता पक्षात प्रवेश करील, अशी एक चर्चा शहरात पसरली होती. त्याला अनेक कारणे होती. मालेगाव शहरात शेकडो स्वागताचे फलक झळकले होते. एका रात्रीतून लागलेले या फलकांवर केवळ माजी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचेच फोटो होते. हे फ्लेक्स अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्या पक्षाच्या नेत्यांच्या फोटोंचा विसर पडला होता.
येवल्याहून छगन भुजबळ हे मालेगावला आले होते. अमित शहा (Amit Shah) हे नाशिकहून मालेगावला आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी या दोघांनीही हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले
कार्यक्रम सुरू झाल्यावर अमित शहा यांनी भुजबळ यांना आपल्याजवळ बोलावून घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि शाह यांच्यात पाच ते सात मिनिटे व्यासपीठावर चर्चा झाली. दोघेही अतिशय उत्साहाने अमित शहा यांच्या चर्चेत सहभागी झाले होते. शाह हे देखील त्यांच्याशी संवाद साधत होते. हा संवाद आणि विषय हे अन्य कोणाला समजू शकलेले नाही. मात्र, देहबोलीवरून एरवी तणावात असणारे भुजबळ या वेळी रिलॅक्स वाटत होते.
यावेळी आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात माजी मंत्री भुजबळ यांनी अमित शहा यांच्या कामाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत आणि शहरा शहरात विकास कामे सुरू झाली आहेत. या गतीने ही कामे सुरू राहिल्यास लवकरच देशभर विकासाचे चित्र निर्माण होईल. या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्नदेखील पूर्ण करण्याचे काम हे नेते करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकंदरीतच गेले काही दिवस मंत्रिपदापासून दूर असलेले भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षावर नाराज आहेत. ते सातत्याने आपली ही नाराजी विविध माध्यमातून व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करीत आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी अशाच पद्धतीने जवळीक निर्माण केल्याचे चित्र होते. आज त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. त्यामुळे भुजबळांनी एका दगडात दोन पक्षी मारले, अशी चर्चा रंगली होती. एकाच वेळी भारतीय जनता पक्षाशी सलगी आणि अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले का, हे येत्या काही दिवसांत दिसून येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.