NCP on Padalkar : अहो पडळकर, करंगळी सुजली म्हणजे डोंगराएवढी होत नसते!
NCP Dhule News : गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कृती व वक्तव्यांतून भाजपच्या नेत्यांना त्यांची निवड किती सुमार दर्जाची आहे, याची जाणीव करून दिली आहे. पडळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यांची खरी पात्रता दाखवून देईन, असा इशारा देण्यात आला आहे. (NCP leaders beaten shoes to Gopichand Padalkar`s image)
धुळे (Dhule) शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने भाजपचे (BJP) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारांश भावसार यांनी पडळकर यांची चांगलीच हेटाळणी केली. ते म्हणाले, करंगळी सुजली म्हणजे डोंगराएवढी होत नसते. मात्र, पडळकर यांना आपला स्तर काय याचा विसर पडला असावा. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत. कोणीच त्यांची दखल घेत नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, की पडळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पडळकर यांच्या विरोधात संतापाची लाट आहे.
उपमुख्यमंत्री पवार राज्याच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पडळकर यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. त्यांच्या या अवघड स्थितीविषयी राष्ट्रवादीला सहानुभूती आहे; परंतु जी व्यक्ती राजकारणासाठी श्री विठोबारायाची खोटी शपथ घेते, त्यास धनगर आरक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपला धनगर आरक्षणाबाबत ब्रह्मज्ञान का प्राप्त झाले नाही? धनगर आरक्षणाबाबत निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी तत्काळ पडळकरांना आवर घालावा, अन्यथा भाजपमधील अनेक लांडगे-कोल्ह्याच्या प्रवृत्ती जनतेसमोर उघड कराव्या लागतील, असा इशारा श्री. भावसार यांनी दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.