
Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर दक्षिण भागावर विकासकामांमध्ये अन्याय होत असून, तो दूर होण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा अचानक उपस्थित केला.
आमदार जगताप यांचे भाजपमध्ये आमदार असलेले सासरे शिवाजी कर्डिले यांनी देखील नगर दक्षिणेवर अन्याय होत असल्याचे म्हणत जावयाचे समर्थन केले. त्यामुळे जावई-सासरे यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा तापणार असे दिसते.
केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्री मोहोळ यांना अहिल्यानगर दक्षिण भागाला शहरालगत विमानतळासाठी आमदार संग्राम जगताप यांनी निवेदन दिले. यानंतर त्यांनी अचानकपणे अहिल्यानगर जिल्हा विभागाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार जगताप यांनी जिल्हा विभाजन होणे आवश्यक आहे, असे म्हटले.
आमदार जगताप म्हणाले, "जिल्हा विभाजन झाले पाहिजे, अशी आपण 2016-2017 पासून मागणी करत आहोत. ठाणे जिल्ह्यातून 2014 मध्ये पालघर जिल्हा झाला. त्याचवेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन व्हायला हवे होते. जिल्ह्यातील प्रमुख धरणे, विमानतळ, शिर्डी (Shirdi)-शनीशिंगणापूरसारखी देवस्थाने उत्तर जिल्ह्यात आहे. दक्षिण तसा दुर्लक्षित राहिला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागाच्या विकासासाठी प्राधान्य मिळायला हवे, विकासाच्या मुद्यावर जिल्हा विभाजन झाले पाहिजे".
'जिल्हा विभाजन आज ना उद्या होणारच आहे. जिल्ह्याचा दक्षिण भाग मागास राहिला आहे. त्यावर जिल्हा विभाजन आवश्यक आहे. विकासाचा एक भाग म्हणून नगर शहरालगत विमानतळ आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही जागा देखील प्रस्तावित केली आहे', असे आमदार जगताप यांनी सांगितले. मंत्री मोहोळ यांनी यावर राज्य सरकारने भूसंपादन करून द्यावे. जागा मिळताच पुढचं काम आमचं राहिल,असे सांगितले.
आमदार जगताप यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा रेटताच, त्यांचे सासरे भाजपचे आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी देखील सुरात सूर मिसळला. जिल्ह्याचा दक्षिण भाग हा मागास राहिला. दरवेळी त्यावर अन्याय होतो. इतर सर्व प्रमुख कार्यक्रम उत्तरेत होतात, असे सांगून जिल्हा विभागाच्या मागणीला समर्थन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.