
Sangram Kote Patil on NCP Shibir : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा राज्याची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आता महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी शिबिर, मेळावे घेतले जात आहेत.
नुकतंच शिर्डी येथे भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्या उपस्थितीत महाशिबिर घेतलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचेही शिबिर शिर्डीतच पार पडणार आहे. यासाठी 'अजित पर्व, दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची' ही शिबिराची टॅग लाईन असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर शिर्डी येथे दिनांक १८ आणि १९ जानेवारी रोजी शिर्डीतील पुष्पक रिसॉर्टमध्ये संपन्न होत आहे. या शिबिरास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व निमंत्रित ५०० जण उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून राज्यस्तरावर पक्ष संघटनेचा विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका, पक्षाचे नियोजन तसेच राज्यस्तरावर पक्ष, संघटना नोंदणी कार्यक्रम अजित पवार(Ajit Pawar) यांची प्रथम नोंदणी करून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रभारी राष्ट्रवादी विद्यार्थी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संग्राम कोते पाटील यांनी दिली आहे.
तर हे शिबिर आधी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार होते. मात्र त्या ठिकाणी व्यवस्था अपुरी पडत असल्याने शिबिराचे स्थळ बदलण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच, या शिबिरात विविध राजकीय विश्लेषकांना निमंत्रित केले जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पक्ष संघटना राज्यात अधिक बळकट करण्यासाठी सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रमही राबण्यास दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या शिबिरासाठी अजित पवार यांचे निकटवर्तीय संग्राम कोते पाटील यांना विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.