Nilesh Lanke News
Nilesh Lanke NewsSarkarnama

Nilesh Lanke News: खासदार कोल्हेंच्या विधानानंतर आमदार लंके दक्षिणेतून तुतारी फुंकणार?

Nilesh Lanke Foundation Ahmednagar: नीलेश लंके प्रतिष्ठानने नगर शहरात आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्य या कार्यक्रमाचा चौथ्या दिवशी समारोप झाला.

Ahmednagar Political: नीलेश लंके प्रतिष्ठानने नगर शहरात (Ahmednagar) आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्य कार्यक्रमाचा चौथ्या दिवशी समारोप झाला. कार्यक्रमाच्या शेवटी महानाट्यात प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचे भाषण गाजले. "दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारी महाराष्ट्राची स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजली पाहिजे," असे सूचक विधान करत खासदार कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंकेंकडे (Nilesh Lanke)लोकसभा २०२४ ची चाचपणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात गेल्या चार दिवसांपासून शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याला आजवरची रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला.

महायुतीतील बोटावर मोजता येतील इतक्याच नेत्यांनी, तर महाविकास आघाडीतील बहुतांशी नेते आणि पदाधिकारी यांनी महानाट्याच्या प्रयोगाला हजेरी लावली. महायुतीतील आमदारांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही सर्वाधिक हजेरी महायुतीतील इतर पक्षांना, विशेष करून भाजपला खटकली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्याशी आमदार लंके यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या संघर्षात भाजपमधील विखे विरोधक आमदार प्रा. राम शिंदे यांची आमदार लंकेंशी जवळीक आहे. या महानाट्याला त्यांनीदेखील हजेरी लावली होती. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीदेखील हजेरी लावली होती.

Nilesh Lanke News
Shrirampur Politics: श्रीरामपूर बाजार समितीच्या सचिव पदावरून सुंदोपसुंदी कायम

या दोन्ही भाजप नेत्यांनी आमदार लंके यांचे कौतुक केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कार्यक्रमात वावर होता. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर शहरातील पदाधिकारी यांची सर्वाधिक हजेरी होती. त्यामुळे या महानाट्याच्या निमित्ताच्या आडून आमदार लंकेंसाठी लोकसभेचे नियोजन होत असल्याची सर्वाधिक चर्चा होती. या चर्चेला बळ दिले आहे, ते महानाट्याच्या शेवटच्या दिवशी अभिनेता खासदार कोल्हे यांच्या विधानाने. खासदार कोल्हे यांनी या विधानामुळे आमदार लंके लोकसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, "शरदचंद्र पवार साहेबांकडे संपूर्ण महाराष्ट्र हा संघर्षयोद्धा म्हणून बघतोय. महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही मावळे लढतोय. लोकनेत्यांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायचे असते. मी मागतोय". महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा, असा जर नेता आमच्या खांद्याला खांदा लावून मिळाला, तर जबाबदारी तुमची आणि लोकनेत्यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी," असेही खासदार कोल्हे यांनी म्हटले.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com