Sangamner News : मद्य सेवनाने आरोग्याबरोबर सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य उद्धवस्त होते. दारूबंदीसाठी गावपातळीवर ग्रामपंचायतींना राज्य सरकारने मोठे अधिकार दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पिंप्री लौकी ग्रामपंचायतीने दारुबंदीसाठी अजब फंडा वापरला आहे. त्यासाठी शक्कल लढवून ठराव घेत अवैध दारू विक्री तसेच पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. (Sangamner Alcohol Ban)
तसेच कोणत्याही निवडणुकीत दारूचे आमिष दाखवणाऱ्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ठराव संमत करण्यात आला. पिंप्री लौकी गावात अवैध दारू विक्री केल्यास 11 हजार रुपये, वरातीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातल्यास 5 हजार रुपये तसेच गावात, शासकीय कार्यालय आणि धार्मिक कार्यक्रमास दारू पिऊन आल्यास 1100 रुपये दंड असणार आहे.
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी गाव हे नेहमीच राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू राहिले आहे. यामुळे या गावातील राजकीय निर्णयाचे अनेक दूरगामी परिणाम होत असतात. पिंप्री लौकी गावात गेल्या 30 वर्षांपासून अवैध दारू विक्रीला बंदी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत स्थानिक माहिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींकडे तक्रारी केल्या होत्या. गावात दारूबंदी होण्यासाठी सरपंच संगीता गीते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपरंच बाजीराव गीते उपस्थित होते. या ग्रामसभेत गावात पुन्हा अवैध दारूविक्री विरोधात ठराव संमत करण्यात आला.
तसेच दारूबंदीच्या ठरावाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली. यावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कारवाई होणार आहे. या ठरावामध्ये निवडणुकीत दारूचे अमिष दाखवणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे स्वागत गावातील महिला आणि ग्रामस्थांनी केले आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.