
Chhagan Bhujbal : राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटमधील नोंदीनुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढल्यापासून ओबीसी समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या केली. त्यापार्श्वभूमीवर ओबीसी नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भावनिक पोस्ट करत ओबीसी समाजाला आवाहन केले आहे.
ओबीसी बांधवांनो आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका. आरक्षण वाचवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत असं भुजबळांनी म्हटलं आहे. भुजबळांनी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती केली आहे. कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका. भलेही आपल्या हक्कांवर अशा प्रकारे गदा आणली जात असेल, तरीही हे दुःखाचं सावट, हे संकट दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आपला न्यायव्यवस्थेवर, संविधानावर पूर्ण विश्वास असून आपल्याला न्याय नक्की मिळेल असं भुजबळांनी म्हटलं आहे.
मंत्री छगन भुजबळांनी फेसबुकवरुन ओबीसी बांधवांना हे आवाहन केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, परभणी जिल्ह्यातील आडगाव दराडे (ता. जिंतूर) येथील कुमार नारायण आघाव, बीड जिल्ह्यातील तागडगाव येथील कांचन आदिनाथ सानप या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी, राहुल पतंगे हा तरूण आणि आत्माराम गणपत भांगे हे रिक्षाचालक या सर्वांनी गेल्या दोन दिवसांत ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली.
या सर्व घटना अतिशय वेदनादायी असून सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली ! या सर्वाचे असे अकस्मात निधन हा त्यांच्या कुटुंबांसाठी खूप मोठा आघात आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सर्व ओबीसी संघटना सहभागी आहोत. एकामागोमाग होत असलेल्या या आत्महत्या म्हणजे ओबीसी समाजावर कोसळलेलं मोठे संकट आहे.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे जवळपास सरसकटच ओबीसी आरक्षण देणाऱ्या शासनाच्या जीआरमुळे समस्त ओबीसी समाज प्रचंड तणावात आहे. आपलं हक्काचं, संघर्षातून मिळवलेलं आरक्षण आता संपल्यात जमा आहे अशी भावना झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांनी आपला जीवनप्रवास संपवला.
गेल्या अवघ्या दोन-तीन आठवड्यांमध्ये वरील चौघांसह स्व. भरत महादेव कराड (वांगदरी, ता. रेणापूर, लातूर), स्व. गोरख नारायण देवडकर (नाथापूर, बीड), स्व. नागनाथ एकनाथ कांगणे (महालिंगी ता. कंधार जि. नांदेड), स्व. माणिक डोईफोडे, (सारोळा मांडवा, ता. वाशी, धाराशिव), स्व. धनंजय नाथा गोरे (हस्तपोखरी, ता. अंबड, जालना) स्व. निवृत्ती यादव (बर्दापूर, ता. अंबाजोगाई, बीड), स्व. भालचंद्र नवनाथ केकान (खंडाळा ता. जि. बीड) इतक्या लोकांनी स्वतःला मरणाच्या दारात ढकललं आहे.
यात तरुण मुले-मुली यांच्यासोबतच आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात आल्याची भावना होऊन जीवन संपवणारे पालक देखील आहेत. शोषित, वंचित घटकांना संविधानिक, कायद्याने मिळालेला कोणताही हक्क हा प्राणवायूप्रमाणे असतो. तो असा कोणत्याही प्रकारे हिरावून घेतला गेला किंवा संकुचित केल्यानंतर घुसमट होणे स्वाभाविक आहे.
परंतु महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बंधू-भगिनींना, तरुण मुला-मुलींना, तसेच पालकांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, की कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका असं आवाहन भुजबळांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.