

Nashik Onion Politics : नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आंदोलन चिघळल्याचे पाहायला मिळाले. चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांसह सहभागी होत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रोश महामोर्चा काढला होता.
कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन व रास्ता रोका करण्यात आला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगरे यांच्यासह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रोहित पवार, अंबादास दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान, कांदा दरावरून सुरू असलेल्या या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, कालच केंद्र सरकारने कांदा खरेदीचा भाव 3.50 पैसे वाढवून जवळपास १५ रुपयांपर्यंत नेलेला आहे. कांद्याची मोठ्या स्वरुपात खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला बैठकीची विनंती केली होती. उद्या संध्याकाळी त्या संदर्भात बैठक होणार आहे. कांद्याच्या संदर्भात राज्य व केंद्र सरकार चर्चा करत आहे. १५ रुपयांची खरेदी आपण सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यातलं सरकार संवेदनशील आहे. पण काही लोक विनाकारण याबाबत राजकारण करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
हे शंभर टक्के राजकीय आंदोलन असल्याचं म्हणत फडणवीसांनी टीका केली. कांदा कापल्यावरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, असे मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या काळात कधी असा निर्णय केला होता का ते दाखवा. असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना केला.
आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच असा निर्णय घेतला आहे. आम्हाला याची कल्पना आहे की, केवळ इतके करून भागणार नाही. त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळेच केंद्र सरकारसोबत उद्या (दि. २७) आम्ही बैठक घेत आहोत. त्या बैठकीतून दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.