एक कोटी लाच प्रकरणात अटकेत असलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांच्याकडे लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाला घबाड सापडले आहे. अजून स्थावर मालमत्ताची तपासणी बाकी असून, अजून बरच काही समोर येण्याची शक्यता आहे. गणेश वाघ यांची उद्या रविवारी पोलिस कोठडी संपत आहे. तसेच वाघ याचा सहकारी अमित गायकवाड याच्या जामीन रद्दच्या अपिलावर 22 नोव्हेंबरला सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होणार आहे.
गणेश वाघ याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केल्यानंतर सर्चिंग सुरू आहे. गणेश वाघ याच्या पुणे येथील घरातून 15 तोळे सोने, अडीच किलो चांदी, 80 हजार रुपये रोख रक्कम आणि काही बँक खात्यांची माहिती आढळली. याशिवाय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि शिवाजीनगर (पुणे) येथे घर आहेत. पथकाने तिथेही तपासणी केली. आज धुळे येथील त्याच्या घराची झडती घेण्यात येणार आहे. याशिवाय धुळे येथील कार्यालयातदेखील तपासणी होईल. स्थावर मालमत्तांचीदेखील तपासणी केली जाणार असून, यासंदर्भातील तपास बराच राहण्याची शक्यता आहे. गणेश वाघ याचे कुटुंब अजूनही समोर येत नसल्याचीही माहिती मिळाली आहे.
नगर येथे केलेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी शासकीय ठेकेदाराकडून गणेश वाघ याने एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. ही लाच नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड यांच्यामार्फत स्वीकारली. ही लाच स्वीकारत असतानाच लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अमित गायकवाड याला ताब्यात घेतल्यानंतर लाचेमागे मुख्य सूत्रधार गणेश वाघ असल्याचे तपासात समोर आले. अमित गायकवाड याला नगर जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर झाला. याविरोधत पथकाने औरंगाबाद खंडपीठात अपिल केले आहे. त्यावर 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. गणेश वाघ याची पोलिस कोठडी उद्या रविवारी संपत आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.