Ahilyanagar News, 11 Dec : भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या राजकीय खेळीमुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पाथर्डी नगरपालिका निवडणुकीतून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार संजय भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
आमदार राजळे यांच्या या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीकडून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 20 उमेदवारांना आपण नगराध्यक्ष पदासाठी नेमकी कोणाला मते मागायची, असा प्रश्न पडला आहे. पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता.
पक्षश्रेष्ठी व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार संजय भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. संजय भागवत यांच्या या निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवार यांना देखील हादरा बसला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, कोपरगाव, देवळाली प्रवरा (ता. राहुरी) आणि नेवासा या चार नगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या होत्या. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापासून थांबलेल्या निवडणुका पुढील टप्प्यावर पुन्हा सुरू झाल्या. चार पैकी पाथर्डी निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड झाली.
संजय भागवत यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने तसंच भागवत यांना पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एबी फॉर्मवर नाव टाकलेले राहुल ढाकणे यांचा उमेदवारी अर्ज देखील पूर्वीच छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला आहे. यामुळे दोन्ही बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार राजकीय हादरा बसला आहे.
राहुल ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जला पाच सूचक नसल्याचे कारण निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व डॉ. उद्धव नाईक यांनी दिले. नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीकडून उमेदवार नसल्याने मोठी कोंडी झाली. राहुल ढाकणे यांचा अर्ज बाद झाल्याने हा मुद्दा राष्ट्रवादीने न्यायालयात घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून पाथर्डीतील शिवाजी गर्जे यांना विधान परिषदेवर संधी दिली. यानंतर शिवाजी गर्जे यांनी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे अस्तित्व दाखवण्यासाठी उमेदवार दिले. परंतु आमदार राजळे यांच्या राजकीय खेळीने राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार नसल्याने चांगलीच कोंडी झाली.
पाथर्डी नगरपालिका निवडणुकीमध्ये गोष्टी समाजाचे मते मोठ्या प्रमाणात आहेत. राष्ट्रवादीने भागवत यांना उमेदवारी देत हीच खेळी केली होती. परंतु आमदार राजळे आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांनी, भागवत यांच्या संपर्कात राहून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त केले.
भागवत यांनीही त्याला प्रतिसाद देत, आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज मागे घेतला. आमदार राजळे यांच्या या खेळीचा थेट फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नगरपालिका निवडणुकीत बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.