अरविंद जाधव-
Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असताना शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे संभाव्य आंदोलन लक्ष्यात घेता पोलिसांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच शहर आणि ग्रामीण भागातील संभाव्य आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. मात्र, तरीही शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.
शहर पोलिसांनी गुरुवारी (ता.11) दिवसभरात 36 आंदोलकांना स्थानबद्ध केले. तर, ग्रामीण पोलिसांनी 33 जणांना स्थानबद्ध केले. हे 69 संभाव्य आंदोलनकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra modi) दौरा संपेपर्यं स्थानबद्ध असणार आहेत. याचबरोबर शहर पोलिसांनी 21 तर ग्रामीण पोलिसांनी 25अशा 46आंदोलनकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र,तरीही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी (farmers) रस्त्यावर कांदे टाकून आंदोलन केले.
पोलिसांनी संभाव्य आंदोलनकर्त्यांची धरपकड केली असली तरीही ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बॅनरबाजी करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सकाळी 10 च्या सुमारास पंतप्रधान नाशिक शहरात दाखल होतील त्यावेळी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या आंदोलनकर्त्यांना रोखून धरणे हे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान असेल.
केंद्र सरकारच्या धोरणांनी शेतकऱ्यांचे स्मशान झालेल्या नाशिक नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत असे बॅनरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झळकावून आपला निषेध व्यक्त केला.
जिल्ह्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन होते. जिल्ह्याची अर्थव्यवस्था कांदा दरावर अवलंबून आहे. मात्र, कांद्यांचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसला.
मागील महिन्याभरात चार हजार रूपयांचा भाव थेट दोन हजार रूपयांच्या खाली उतरला. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनांकडून करण्यात येतो आहे. यामुळे केंद्र सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड राग आहे. प्रशासनाला याची जाणिव असल्याने शेतकरी नेत्यांकडे पोलिसांनी लक्ष वळवले. मात्र तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर कांदे ओतून आणि फलक झळकावून आपला निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीने (शरद पवार गट) गळ्यात कांद्यांच्या माळा घालून पंतप्रधानाचे स्वागत करण्याचा इशारा दिलेला आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.