Chhagan Bhujbal News: लासलगाव बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व याला राजकारणात मोठे महत्त्व आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील या बाजार समिती राजकीय गटबाजी उफाळून आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड झाली. यामध्ये छगन भुजबळ यांच्या गटातील व भाजपचे डि. के. जगताप सभापती झाले. जयदत्त होळकर आणि बाळासाहेब क्षिरसागर गटाचे ललित दरेकर उपसभापती झाले. भुजबळ यांनी सभापती पदासाठी जगताप यांचे नाव सुचविले होते.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी थेट हस्तक्षेप केल्याने सभापती आणि उपसभापतींची निवडणूक सुरळीत पार पडली. मात्र या निवडणुकीत सर्व संचालक मनापासून एकत्र आले होते असे चित्र नव्हते. त्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते दिसून आले. त्यामुळे लासलगाव समितीत मतभेदाचे नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत.
मंगळवारी लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाची बैठक झाली. सभापती डी. के. जगताप आणि उपसभापती ललित दरेकर यांसह त्यांचे पाच समर्थक असे सात संचालक उपस्थित होते. १८ संचालकांपैकी अवघे सात संचालक होते. त्यामुळे गणपूर्ती अभावी ही सभा तहकूब करावी लागली. सभापतींनी संचालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संचालक फिरकले नाही.
लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळातील हा वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे पडद्यामागून विविध राजकीय डावपेच आखले जात आहेत. श्री. होळकर यांनी सुचविलेले उपसभापती दरेकर यांच्या विषयी नाराजी म्हणून हे संचालक अलिप्त असल्याचे बोलले जाते. त्याचा फटका उपसभापती दरेकर यांना बसण्याची चिन्हे आहेत.
माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी सभापती, उपसभापती निवडणुकीत थेट हस्तक्षेप केला. तसा ते प्रत्येक निवडणुकीत करीतच असतात. मात्र यंदा भुजबळ यांच्या व्यतिरिक्त असलेला पंढरीनाथ थोरे आणि डी के जगताप यांच्या गटात फुट पडली. सध्या डिके जगताप हे होळकर यांच्या समवेत आहेत. त्यामुळे भुजबळ यांनीही सावध खेळी केली.
सभापती आणि उपसभापती यांची नावे निश्चित करताना पडद्यामागून मोठे राजकारण घडले. त्यामुळे भुजबळ यांनी सभापती म्हणून जगताप यांचे नाव सुचविले. उपसभापती कोण? हे मात्र भुजबळ यांनी होळकर यांच्यावर सोपविले होते. होळकर यांनी राजकीय सोय म्हणून ललित दरेकर यांना उपसभापती केले. ही निवड बहुतांशी संचालकांना मान्य नव्हती.
आता सभापती आणि उपसभापती दोघांनाही यापुढे कारभार कसा हकावा ही मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रोजच संचालकांमध्ये राजकीय डावपेच आखले जात आहेत. ११ संचालक विरोधात गेल्याने अविश्वास प्रस्तावाचा खेळ होतो की काय? याचीही भीती सभापतींना आणि उपसभापतींना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माझी उपमुख्यमंत्री भुजबळ यांना यात लक्ष घालून सर्व गटांचे मनोमिलन करावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.