
Honey Trap Case : राज्यात हनी ट्रॅप प्रकरण गाजत असून त्याचं जळगाव कनेक्शन समोर आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या प्रफुल्ल लोढांवर हनी ट्रॅपसह वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून सध्या ते मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या मैत्रिणीवर नोकरीच्या आमिषाने अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच अश्लील छायाचित्र काढणे, मुलींना डांबून ठेवणे आणि धमकावणे असेही आरोप त्याच्यावर आहेत. तसेच पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा लोढा यांच्यावर दाखल झाला आहे.
प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. गिरीश महाजन यांच्याशी संबंध आले आणि सर्वसामन्य कुटुंबातील लोढा कोट्याधीश कसा झाला याचीही चौकशी करावी असं खडसे यांनी म्हटलं आहे. त्यावरुन महाजन व खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणात आता प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा याने उडी घेतली आहे. माध्यमांसमोर येऊन त्याने आपली बाजु मांडली. त्याने एकनाथ खडसे यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांचे हे षडयंत्र आहे, त्यांनी आपल्या वडिलांना अडकविले आहे, असा आरोप प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा यांनी केला आहे.
पवन लोढा यांनी सांगितले की, आमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती विडलोपार्जित आहे. एकनाथ खडसे जेंव्हा गाडीमध्ये रॉकेल टाकून फिरायचे तेव्हा ते माझ्या वडिलांकडे यायचे. ते माझ्या वडिलांकडे पैसे मागायचे. एकनाथ खडसे यांनी कोणतीही चौकशी लावावी. त्या संदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही. तसेच या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेले पेन ड्राईव्ह आणि सीडी माझ्या कामाचे आहेत. मी महावितरण कंपनीचे काम करतो. त्या कामाचे ते आहेत असं पवन लोढा याने सांगितले.
तसेच गिरीश महाजन हे मोठे नेते असल्याने एकनाथ खडसे त्यांच्यावर आरोप करत आहेत. परंतु आमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ती बापजाद्यापासून आहे. उलट खडसे यांनीच भ्रष्टाचार करून पैसे कमवले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि दैवत राहतील असं पवन लोढा याने म्हटलं आहे. मागच्या काळात आपल्या वडिलांमध्ये आणि गिरीश महाजन यांच्यात काही मतभेद झाले होते. मात्र, ते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निर्माण केले होते असा आरोप करत ते आता दूर झाले आहेत, असे पवन लोढा याने सांगितले.
एकनाथ खडसे यांचा मुलगा निखील खडसे यांच्या मृत्यूमुळे माझे वडील प्रफुल्ल लोढा यांना देखील मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच त्यांनी 2020 मध्ये पत्रकार परिषद घेत त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली होती. माझ्या वडिलांनी (प्रफुल्ल लोढा) यांनी ज्या एसआयटी चौकशीची मागणी केली होती ती चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी पवन लोढा यांनी केली.
दरम्यान लोढा यांच्या या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, याप्रकरणात कुठल्याही मोठ्या साहेबांचा संबंध नाही. उलट प्रफुल्ल लोढा यांनी व्हिडिओमध्ये गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांचे नाव घेतले आहे. महाजन व नाईक यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हणत प्रफुल्ल लोढा यांनी त्यांच्याकडे जे काही आहे, त्याबाबत सांगितले. प्रफुल्ल लोढा त्यांचे कुटुंब गिरीश महाजनांना भेटले, त्यामुळे मला शंका यायला लागली आहे असं एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. Honey trap case
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.