Nanded News, 25 Oct : राजकारण आणि बँकिंग या दोन्ही क्षेत्रांचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. कर्जाच्या थकबाकी वसुलीत आता थेट राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी सहभागी असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून वसुलीचे रॅकेट चालविले जात असल्याचे आरोप होत आहेत.
नांदेड येथे खालसा फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांकडून झालेल्या छळामुळे चंद्रकांत शिंदे या शेतकऱ्याने कंपनीच्या कार्यालयातच गळफास घेतला. या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कर्जवसुलीच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राज्यात दुष्काळ आणि आर्थिक मंदीची गंभीर स्थिती आहे. दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहेत, तर मंदीमुळे शहरी भागात अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. यातून आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. खासगी फायनान्स कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज दिले जाते. गरजेपोटी कर्ज घेणारे शेतकरी आणि बेरोजगार या कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे गंभीर सामाजिक आणि गुन्हेगारी समस्या निर्माण झाली आहे.
खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीपासून ते रस्त्यांवरील टोलवसुलीपर्यंतच्या व्यवहारांत थेट राजकीय नेते, आमदार आणि लोकप्रतिनिधी सहभागी असल्याचे चित्र आहे. यातून एक नवी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे. तरुण पिढीकडूनही अशा लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन दिले जात आहे.
संबंधित लोकप्रतिनिधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि वादग्रस्त तरुणांना वसुलीसाठी नियुक्त करतात. फोनवरून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि कर्जदारांचा छळ यासंबंधीचे व्हिडीओ आणि ऑडिओ समाजमाध्यमांवर रोज व्हायरल होत आहेत. या प्रकारांत बँकिंग नियम आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना धाब्यावर बसवले जात आहे.
या संदर्भात दररोज शेकडो तक्रारी होत असतानाही पोलीस आणि शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय नेत्यांचा, विशेषतः सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींचा वसुलीच्या व्यवहारांत थेट सहभाग असल्याने या छळाच्या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. परिणामी, आता आत्महत्यांसारखे गंभीर प्रकार घडू लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.