

Satyajeet Tambe BJP entry : भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मित्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा जोर धरल आहे. सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत स्वतंत्र आणि सज्ञान आहे, त्याच निर्णय तो घेऊ शकतो, असे म्हटले आहे.
थोरात यांची ही प्रतिक्रिया समोर येताच, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, सत्यजित तांबे हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. जो निर्णय घ्यायचा तो सत्यजित तांबे यांनी घ्यायचा आहे, असे सूचक विधान केले.
मंत्री विखे पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे सत्यजीत तांबे यांच्या भजाप प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला आहे. दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
श्रीरामपूर (Shrirampur) इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण झालं. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी सूचक असे विधान केले.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "जो निर्णय घ्यायचा तो सत्यजित तांबे यांनी घ्यायचा आहे. सत्यजित तांबे हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. आमदार तांबे भाजपमध्ये (BJP) आले, तर आनंदच होईल." नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी भाजपने उमेदवार दिला नव्हता. महाविकास आघाडीचा उमेदवार आणि सत्यजीत तांबे यांच्यात थेट लढत झाली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने उमेदवार दिला नव्हता, अशी चर्चा होती. पण मंत्री विखे पाटील यांनी काल प्रतिक्रिया देताना, तांबे यांचा विजय भाजपच्या पाठिंब्याने झाल्याचे सांगत, खरं ओठांवर आणलं. याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि सत्यजीत तांबे यांचे मैत्री सर्वश्रूत, अशी आहे.
नाशिक पदवीधरच्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. या चर्चा तशाच सुरू राहिल्या. मध्यंतरी मुलाखतीत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी अॅक्सेसिबल नाहीत, महाराष्ट्रातील कोणत्याही काँग्रेस नेत्याने राहुल गांधींना फोन लावून पुढील एका तासात दिल्लीत भेट घ्यावी, असे विधान केले. त्यावेळी काँग्रेसविरुद्ध सत्यजीत तांबे, असा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात उफाळला होता.
आता पुन्हा सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर सत्यजीत यांचे मामा, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यापाठोपाठ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांच्या निर्णयाचे स्वागत करू, असे म्हटले आहे. पण सत्यजीत तांबे यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दरम्यान, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विसंगत विधान यानिमित्ताने समोर आली आहेत. सत्यजीत तांबे यांना काँग्रेसची पार्श्वभूमी आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका देखील केली आहे. त्यांच्या पोस्टरवर काळे देखील फेकले आहे.
यातच, सत्यजीत तांबे भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना, त्यांचे आनंदाने स्वागत करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणत आहे. पण त्याचवेळी त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्ष संपलेला आहे.
अशा संपलेल्या पक्षाची लोक न घेण्याच्या मानसिकतेपर्यंत आम्ही आलो आहोत आणि त्यांना इथं घेऊन आमचा पक्ष संपवायचं नाही, अशी आमची भूमिका मांडली आहे. त्यामुळे विखे पाटील पिता-पुत्रांची विसंगत भूमिकेवर आता चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.