Gandhi Vs Modi Politics : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी नाशिक शहरात दाखल झाली. या वेळी शालिमार चौकात त्यांनी केलेले भाषण उपस्थितांना प्रभावित करून गेले. या वेळी त्यांनी एका युवकाला आपल्याजवळ बोलवून मोदी जनतेचा खिसा कसा कापतात, याचे चक्क प्रात्यक्षिक करून दाखविले.
गुरुवारी झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी जनतेच्या दुखऱ्या नसेवरच अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, देशात दलितांचे प्रमाण किती आहे?, आदिवासींची संख्या किती आहे?, गरिबांची संख्या किती आहे?, हे तुमच्यापैकी कोणालाच माहिती नाही. पण माझ्याकडे याची आकडेवारी आहे. तुम्ही सर्व ९० टक्के आहात. मात्र तुमचा सरकारमध्ये सहभाग किती?, याचा कधी विचार केला आहे का?, तुम्हाला केंद्र सरकार कशासाठीही विचारत नाही. तुम्हीदेखील ते सहन करता गप्प राहता तुमच्या हक्कासाठी केव्हा आवाज उठवणार आहात. तेव्हा परिवर्तन करणार आहात. आता परिवर्तनाची हीच योग्य वेळ आहे, या संधीचा लाभ घ्या. (Rahul Gandhi News)
या देशाचे सबंध बजेट ९० अधिकारी करतात. त्यात दलित, मागासवर्गीय, ओबीसी किती आहेत, फक्त तीन अधिकारी आहेत. त्यांनाही काहीही किंमत दिली जात नाही. फार तर पाच टक्के बजेट वितरण हे तीन अधिकारी करत असावेत. ते देशातील गरीब मागासवर्गीयांना काय न्याय देऊ शकतील?, याबाबत जनतेला काहीही माहिती नाही.
माध्यमे, माध्यमांतील पत्रकार, उद्योगपती, उद्योग, आयएएस, आयपीएस, सचिव, न्यायाधीश, शिक्षण संस्था अशा अनेक क्षेत्रात कोण आहेत, त्यांची यादी माझ्याकडे आहे. त्यात तुमच्यापैकी कोणीही नाही. दलित, आदिवासी, ओबीसी या घटकांना तिथे स्थान नाही. मग हे लोक तुमच्यासाठी कसे काम करतील?, त्यामुळेच आपण येथे भेटतो आहोत, चर्चा करतो आहोत, याच्या बातम्या कधीही माध्यमे दाखवणार नाहीत.
युवकांना त्यात कुठेही संधी नाही. युवकांना नोकरीच्या जाहिराती दाखविल्या जातात. युवक परिश्रम करतात. परीक्षा द्यायला जातात, तेव्हा पेपर लीक झालेला असतो. पेपर लीक झाल्याचे दाखवून तुमची परीक्षा आणि भरती रद्द होते. तुम्ही पुन्हा बेरोजगारांच्या रांगेत उभे राहता. अशा प्रकारे तुमची व जनतेची फसवणूक पंतप्रधान मोदी यांचे सरकार करीत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी राहुल गांधी यांनी संतोष ठाकूर या युवकाला आपल्या जीपच्या बोनेटवर बोलवले. त्यानंतर त्याला इकडे पाहा, तिकडे पाहा, खाली पाहा, वर पाहा, पाकिस्तान काय करतो आहे ते पाहा, चीनमध्ये काय चालू आहे ते बघ. राम मंदिर बांधतो आहे तिकडे बघ, असे सांगत त्याला विविध दिशांना पाहायला लावले. तो युवक त्यात व्यस्त झाल्यावर हळूच त्याच्या पाकिटाला हात लावला आणि पंतप्रधान मोदी जनतेचा खिसा कसा कापतात त्याचे हे उदाहरण आहे, असे प्रात्यक्षिक करून दाखविले. यापासून वाचायचे असेल तर तुम्हाला नेमक्या प्रश्नांवर ठाम राहावे लागेल आणि केंद्र सरकारच्या भूलथापांना बळी न पडता उत्तर द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी प्रचंड टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी चुकीच्या पद्धतीने जीएसटीची कर आकारणी केली आहे. तुम्ही एक शर्ट घेता त्यावर अठरा टक्के जीएसटी आहे. अदानी एक शर्ट घेतो तर त्यालाही तेवढाच जीएसटी आहे. गरीब आणि श्रीमंतावर एकसारखा जीएसटी कसा असू शकतो. आमचे सरकार आल्यावर सर्वात आधी त्याची पुनर्रचना करण्यात येईल. नव्वद टक्के समाजाला सरकार आणि व्यवस्थेत सहभाग मिळावा म्हणून जातीय जनगणना करण्यात येईल, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या वेळी सांगितले.
R