Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील महाविकास आघाडीसोबत वंचितची युती होणार का? आम्ही किती जागा त्यांच्याकडे मागितल्या? हा मुळात प्रश्नच नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या दहा जागांवरून मतभेद आहेत, तर काही जागा अशा आहेत, ज्यावरून आघाडीतील तीनही पक्षात मतभेद आहेत. त्यामुळे आधी त्यांच्यात तोडगा निघणे गरजेचे आहे, त्यानंतर आम्ही जागा मागण्याचा प्रश्न येतो.
माझी तयारी तर सगळ्या 48 जागांवर आहे, पण मी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आणला.
राज्यात महाविकास आघाडीच राहते की नाही? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहणार, अन्यथा या तिघांपैकी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल त्याला घेऊन निवडणुका लढवणार, असेही आंबेडकरांना स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar), महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागाबाबतची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या विरोधात असलेले सगळे पक्ष स्वतंत्र लढले तर भाजप 22 टक्यांच्यावर मतं घेऊ शकणार नाहीत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांना त्यांची त्यांची मते मिळतील. ती सगळी हिंदूंची असतील. भाजपला केवळ कट्टर धार्मिक मते जातील, तर दलित मते आम्हाला मिळतील, असा दावा आंबेडकरांनी केला.
जागावाटपावरून काँग्रेस- ठाकरे गटात दहा जागांवर मतभेद आहेत. पाच जागांवर राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद आहेत. यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की तुटते? हा प्रश्न आहे. अन्यथा जो पक्ष आमच्यासोबत येईल त्यांना घेऊन लढू. त्यांचं मिटेपर्यंत आम्ही काही मागणार नाही. माझ्याकडे 48 जागांचा पर्याय शिल्लक आहे पण शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. पण तेच एकत्र राहतील का? याची खात्री आधी त्यांनी द्यावी, असा चिमटाही आंबेडकरांनी काढला.
ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावरही आंबेडकरांनी टीका केली. संजय राऊत हे तीनही पक्षांचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत, असा टोला लगावताना मी कानफाट्या राजकारणी नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेसला आपण पाठवलेल्या पत्राचे अद्याप काहीही उत्तर आलेले नाही, असे स्पष्ट करतानाच छत्रपती संभाजीनगर लोकसभेची आम्ही जिंकलेली जागा कशी सोडणार? असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे टेन्शन वाढवले.
तसेच महाविकास आघाडी होत नसेल तर सगळ्यांनी मला पाठिंबा द्यावा, मी भाजपला(BJP) आपटून दाखवतो, असा इशाराही आंबेडकरांनी दिला. तसेच आपण फक्त अकोल्यातूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण आम्हाला नाही, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.