

Ahilyanagar political update : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील प्रचंड सक्रिय झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकाच्या निवडणुकीनिमित्ताने आणि आगामी काळात होणाऱ्या जिल्हा सहकारी बँक अन् जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा देखील काळ आहे.
यातून लोकसभेची चाचपणी, पेरणी सुजय विखे पाटील करत आहे. यातच लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचनेवर विखे पाटील यांनी मोजकचं भाष्य करताना अहिल्यानगर जिल्ह्यात तीन मतदारसंघ असतील, असे म्हटलं आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी सभांचा धडाका लावला आहे. राहुरी मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत. वांबोरी इथं झालेल्या छोटेखानी सभेत, विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होतील, असे म्हटलं आहे.
विखे पाटील यांनी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाबाबत केलेल्या विधानामुळे अहिल्यानगरमधील राजकीय गणितं आगामी काळात बदलतील, असे संकेत आहेत. त्यावर चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात अहिल्यानगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ, असे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी मतदारसंघ हा राखीव आहे. तर अहिल्यानगर खुला आहे.
विखे पाटील यांच्या माहितीनुसार, आता अहिल्यानगर जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. त्यामुळे या पूर्वीच्या दोन्ही मतदारसंघाची तोडफोड होणार हे निश्चित झालं आहे. याचा परिणाम थेट जिल्ह्यातील राजकीय गणितांवर होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. हे विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा-सहाने विभागले केले आहेत.
यातच लोकसभेसाठी आगामी काळात महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. नव्याने होणाऱ्या या तीन मतदारसंघात किती मतदारसंघ राखीव राहतात, याकडे लक्ष असणार आहे. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर त्यावर सर्वाधिक राजकीय पकड ठेवण्यासाठी, बऱ्याच राजकीय उलथापालथी होतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
2011 मध्ये भारतात शेवटची जनगणना झाली. दर दहा वर्षांनी होणारी 2021 सालची गणना आता सुरू होत आहे. 2002च्या घटनादुरुस्तीनुसार 2026 नंतरच लोकसभेच्या संख्याविस्तार होऊ शकतो.
भारताच्या लोकसभेचा 2026 मध्ये संख्याविस्तार जर झाला, तर तेव्हा एकूण आणि राज्यनिहाय संख्या किती असेल याचे विविध अभ्यास गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहे. सध्याच्या 543 या सदस्यंख्येवरुन एकूण संख्या ही एकदम 848 इतकी होईल आणि त्यात 143 खासदार हे एकट्या उत्तर प्रदेशमधून असतील, असा अंदाज आहे.
दुसऱ्या क्रमांकावर 79 खासदारांसह बिहार असेल, तर तूर्तात 48 खासदारांसह दुसऱ्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र 76 खासदारसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो. एकूण 888 सदस्य बसू शकतील एवढं मोठं लोकसभेचं सभागृह असणारी नवी संसद सज्ज आहे. वाढलेल्या खासदारांसाठी बसण्याची अत्याधुनिक सोय आणि तयारी झाली आहे. त्यामुळेच नव्या, विस्तारित, अधिक सदस्यसंख्येच्या लोकसभेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.