शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश महापालिका निवडणुकीसाठीच!

कॉंग्रेस पक्षाच्या नव्या बांधणीकडे लागले सगळ्यांचे डोळे
Rashid Shaikh & MLA Maulana Mufti
Rashid Shaikh & MLA Maulana MuftiSarkarnama

प्रमोद सावंत

मालेगाव : शहरात (Malegaon) गेल्या तीन दशकांपासून कॉंग्रेसची (Congress) धुरा सांभाळणारे व गांधी कुटुंबियांशी एकनिष्ठ असणाऱ्या माजी आमदार रशीद शेख, विद्यमान महापौर ताहेरा शेख यांच्यासह महापालिकेतील कॉंग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

Rashid Shaikh & MLA Maulana Mufti
मालेगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश ही भाजपसाठी धोक्याची घंटा?

राष्ट्रीय पक्षाचा नावलौकिक गमावू पाहणाऱ्या कॉंग्रेसची विविध राज्य व विभागातील स्थिती बिकट झाली आहे. या कठीण काळात देखील मालेगावी कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून होते. रशीद शेख यांचे पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांनी यापुर्वीच हाताची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते. महापालिकेतील कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली. उत्तर महाराष्ट्रातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहेत. शेख कुटुंबियांच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांसह प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळ मिळाले असून कॉंग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

Rashid Shaikh & MLA Maulana Mufti
विरोधकांना ओरडू दे, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे!

काळाची पाऊले ओळखून व स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेता शेख कुटुंबियांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने व प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात महाविकास आघाडी सत्तारुढ झाल्यापासून येथील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिलेला मान, विकास कामांसाठीचे अर्थसहाय्य, समस्या जाणून घेतानाच त्या सोडविण्याची रणनिती यामुळे येथील कॉंग्रेसजन श्री. पवार यांच्या मोहात पडले. त्याची परिणीती राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशात झाली. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसचा पारंपारिक मित्र पक्ष आहे. एक विचारधारा असल्याने कॉंग्रेसमध्ये राहूनच आपण मुलाला सहकार्य करु, अशी सावध भूमिका प्रारंभी श्री. शेख यांनी घेतली होती. मात्र, शहरातील आक्रमक प्रचार पाहता निवडणूक प्रचार चिन्ह शहरवासियांच्या मनावर बिंबविणे आवश्‍यक असते. अशा स्थितीत दोघांचे समर्थक युती झाल्यानंतरही हात व घड्याळ या दोन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत काही प्रमाणात फटका बसला असता.

शहरात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल हे श्री. शेख यांचे कट्टर विरोधक आहेत. एमआयएमने सातत्याने मुस्लिमांचा अनुनय करतानाच विखारी प्रचार केला. कॉंग्रेस या प्रचाराला जशास तसे उत्तर देऊ शकत नाही. राज्य पातळीवर कॉंग्रेसकडे सर्वमान्य नेतृत्व नाही. पक्ष हळूहळू लोप पावत असतानाही गटबाजी संपुष्टात येण्याचे नाव नाही. प्रदेश व जिल्हा पातळीवर असलेल्या नेतृत्वाबद्दलही नाराजी होती. पक्षात नजीकच्या काळात काम करणाऱ्यांऐवजी जी- हुजेरी करणाऱ्यांना स्थान दिले जाते, असा त्यांचा आरोप आहे. त्यातच भाजप वगळता राज्य पातळीवर विविध राज्यात प्रादेशिक पक्षांचे महत्व वाढू लागले आहे. यातूनच हा निर्णय झाला.

आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वाधिक जागा आणून महापालिकेतील सत्ता अबाधित राखण्याचे शेख पिता- पुत्रांचे मनसुबे आहेत. शहरात निवडणूक काळात विकास कामांऐवजी दखणी-मोमीन हा पारंपारीक वाद उफाळून येतो. मतदार धार्मिक ज्वराला बळी पडतात. या वादात आमदार मौलाना मुफ्ती हे वरचढ ठरतात.

त्यांना रोखण्यासाठी मोमीन- अन्सारी मुस्लीम बांधवांची काही प्रमाणात मन वळविण्याची कसरत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून शेख कुटुंबियांना करावी लागणार आहे. हे शक्य झाल्यास महापालिकेचे मैदान मारणे सुलभ होईल. गेली तीन दशक शेख कुटुंबिय व कॉंग्रेस हे समीकरण झाले होते. या प्रवेशामुळे कॉंग्रेसचा सफाया झाला आहे. पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसी व गेल्या विधानसभा निवडणुकीपासून आमदार मौलाना मुफ्ती यांचे कट्टर समर्थक झालेले माजी नगराध्यक्ष एजाज बेग अवघ्या दोन वर्षात मौलाना मुफ्तींपासून दुरावले. त्यांनी आता कॉंग्रेसची धुरा सांभाळली आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचाही प्रवेश सोहळा पार पडला. श्री. बेग यांचे अस्तित्व काही प्रभागांपुरते मर्यादीत आहे. कॉंग्रेसची पक्ष बांधणी करण्यासाठी त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com