

Shrirampur politics : नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय पटलावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे आमदार सत्यजित तांबे यांच्या श्रीरामपूर दौऱ्याने शहरात शैक्षणिक आणि राजकीय दोन्ही वर्तुळात चांगलीच चर्चा घडवून आणली.
सकाळी 9 ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत, असा नऊ तासांचा हा ‘संवाद दौरा’ केवळ औपचारिक भेटीगाठींपुरता मर्यादित न राहता, शाळांच्या पदरात निधी पाडणारा आणि पालिकेत राजकीय चिमटे काढणारा ठरला.
शिक्षण क्षेत्रातील लालफितीचा कारभार बाजूला सारत आमदार तांबे (Satyajeet Tambe) यांनी स्थानिक शाळांच्या मागण्यांवर जागेवरच निर्णय घेण्याचा धडाका लावला. सोमय्या हायस्कूलला बाहेर शेड उभारण्यासाठी स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजय छल्लारे यांनी गळ घातली असता, त्यांनी आमदार निधीतून तत्काळ पाच लाख रुपये जाहीर केले. यावेळी हिंदू सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी आणि मुख्याध्यापिका उषा गाडेकर उपस्थित होत्या.
श्रीरामपूर (Shrirampur) एज्युकेशन सोसायटीत अध्यक्ष राम टेकावडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी मांडलेली बेंचेसची मागणी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मान्य केली. २०१० पूर्वीच्या शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षेच्या अटीतून मुक्ती मिळावी, ही राज्यभरातील शिक्षकांची दुखरी नस तांबे यांच्यासमोर मांडण्यात आली. त्यावर शासनस्तरावर वज्रमूठ उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याशिवाय, बालिका शाळेत स्कूल कमिटीच्या अध्यक्ष अनघा देशपांडे व प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय साबळे यांनी, तर मॉडेल स्कूलमध्ये प्राचार्य सोनिया गुलाटी यांनी स्वागत केले. मॉडेल स्कूलने शहरात प्रथमच सुरू केलेल्या ‘स्पॉट ट्रॅकर मशीन’ या तंत्रज्ञानाची पाहणी करून कौतुक केले.
शाळांचा दौरा आटोपून तांबे पालिकेत पोहोचले अन् तिथे नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या दालनात राजकीय फटकेबाजीला उधाण आले. विधान परिषद निवडणुकीचा विषय निघताच तांबे यांनी ससाणे यांना, तुम्ही अर्ज भरून नक्की का काढला? असा प्रश्न टाकला. तेवढ्यात काँग्रेसचे गटनेते मुझफ्फर शेख समोर येताच तांबे यांनी थेट ‘गुगली’ टाकली ‘ससाणे साहेबांच्या निवडणुकीत हेच निरीक्षक होते. तुम्ही अर्ज मागे घेतल्याने आमचे नगरसेवक चांगलेच नाराज झाले.’
यावर ससाणे यांनी, ‘विधान परिषदेला अर्ज भरल्यावरच आपण किती ‘पॉप्युलर’ असून जिल्ह्यात कार्यकर्ते असल्याचे मला कळले,’ अशी शेरेबाजी केली. हाच धागा पकडत तांबे यांनी टोला लगावला, ‘तुम्ही आता अजिबात थांबू नका. मुझफ्फर शेख गटनेते आहेत, त्यामुळे त्यांना सर्व माहिती असून, मागील निवडणुकीचा अनुभवही आहे.’ तांबेंच्या या मिश्किल टिपणीवर सभागृहात एकच हशा पिकला.
दुपारी शासकीय विश्रामगृहावर नगरसेवक राजेंद्र पवार यांनी संजयनगर येथील शाळा नऊच्या इमारतीसाठी एक कोटी रुपयांच्या निधीचे निवेदन सोपवले. राजकीय आणि शैक्षणिक समीकरणांसोबत सामाजिक बांधिलकी जपत तांबे यांनी राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. ‘श्रीरामपूरशी माझे राजकीय नव्हे, तर जिव्हाळ्याचे नाते आहे,’ असे सांगत तांबे यांनी दौऱ्याची सांगता केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.