Akola Political News : लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी राज्यातील राजकीय पक्षांनी काही ठिकाणी आत्तापासून कामाला सुरुवात केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असल्याचे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच केले. (MLA Nitin Deshmukh along with Rajesh Mishra also had various offers)
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेवर असलेल्या वडेट्टीवार यांचा वऱ्हाडातील दौरा आटोपत नाही, तोच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अकोल्यातील विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूकपूर्व ही मशागत असल्याचे सांगण्यात येत आहे. अकोल्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण नेते राजेश मिश्रा यांच्या नावाने ही तयारी सुरू झाली आहे.
मिश्रा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे (Shivsena) एकनिष्ठ कार्यकर्ते व नेते आहेत. शिवसेनेचा अकोल्यातील (Akola) कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून मिश्रा यांची ओळख आहे. अकोल्यातील जुन्या शहरात असलेल्या शिवसेना वसाहत या अत्यंत संवेदनशील भागातील रहिवासी मिश्रा हे चांगलेच सक्रिय आहेत. विविध सण, उत्सव, वादाचे प्रसंग, नैसर्गिक आपत्ती व प्रसंगी घडलेल्या जातीय दंगलींमध्येही मिश्रा लोकांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह राजेश मिश्रा यांनाही शिंदे गटाकडून विविध ऑफर होत्या. परंतु मिश्रा यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. या एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणून आता अकोला विधानसभेसाठी पक्षाने संधी द्यावी, अशी आशा मिश्रा व त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. अकोल्यात ज्या मतदारसंघातून मिश्रा इच्छुक आहेत, त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे (BJP) आमदार गोवर्धन शर्मा करतात.
अनेक वर्षांपासून शर्मा यांच्या रूपात भाजपने हा गड अभेद्य ठेवला आहे. सध्या आमदार शर्मा यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे भाजप या मतदारसंघातून नवीन चेहरा शोधत आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे एक माजी महापौर पुढे सरसावले आहेत. परंतु त्यांना पक्षाने प्रतिनिधित्व दिल्यास भाजपचा गड धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण या नावाला संघ, पक्ष व मतदार या साऱ्यांमधून विरोध आहे.
अशात आमदार शर्मा यांच्यानंतर जर कोणी हिंदुत्ववादी चेहरा या मतदारसंघात असेल, तर तो मिश्रा हाच आहे, असा प्रचार सध्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मिश्रा यांच्या नावाची अधिकृत घोषणा ठाकरे गटाने अद्याप केलेली नसली तरी अकोल्यातील त्यांच्या चाहत्यांनी अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप, पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून मिश्रा हे विधानसभा निवडणूक लढवतीलच, याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. गेल्या निवडणुकीत अकोल्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर झाली होती.
आमदार शर्मा यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार साजिद खान पठाण केवळ दोन हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. भाजपने इच्छुक असलेल्या माजी महापौरांना, शिवसेनेने मिश्रांना व एमआयएमने साजिद यांना संधी दिल्यास (तशी शक्यता वर्तवण्यात येते आहे) अकोल्यातील विधानसभा निवडणूक एमआयएम विरुद्ध ठाकरे गट, अशी थेट होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.